डोळे ढापून वत्ताहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:52+5:302021-08-02T04:11:52+5:30
‘काय सांगा बाबू, आता पंधरा दिस होयत इले. पावसाचो डोळो उघडो नाय, डोळे ढापून वत्ताहा ! काय करशीत ह्या ...
‘काय सांगा बाबू, आता पंधरा दिस होयत इले. पावसाचो डोळो उघडो नाय, डोळे ढापून वत्ताहा ! काय करशीत ह्या पावसाक तरी, खुळावलोहा पावस! गेल्या आठवडयात बघलंस ना, टिपूस नाय पडलो पावसाचो. मिरगाक बोकाळलंलो तरवो जून जायत इलो. आता म्हतला, तरवो लावणार तरी कसो? पावसाचो थेंब नाय. पांदीतल्या असग्यान तेच्यातय साधून घेतल्यान. त्येचे मळ्याचे फाळयें ना, पाणयाक तोटो नाय, अर्धे अधिक फाळयें लावल्यान. आमचे आपले भरडाचे सताठ कुणगे, पाणयाशिवाय लावतलं कसे? शेतिय आता परवाडना नाय बाबू, काय करशीत, आपला हक्काचा जाॅत नाय. सगळा इकतचा नि दुसऱ्यार अवलंबून. तसा आता कोणाचाच जाॅत नाय म्हणा. नये पावरटीलर काय म्हणतत ते इलेहत ना? आता तेंच्यारच सगळो शेतीचो भार. काय करतलं, एका तासाचे साडेतीनशे घेतंत, रोकडे. खयसून आणतलं पैसो आणि पिकतला तरी किती तरीपण काबाडकष्ट केलंलो जीव गप ऱ्हवता काय रे ? सगळाच सोडून कसा चलात?
पावसाचा चिन्ह नाय त म्हतला तवसर भयमूग टाकून घेवया. प्रत्येक उपासाक बबनो शेंग्यांचे लाडू करूक सांगता, पण त्येका सांगलंय शेंगे संपले. घर म्हणान राखान ठेवलले पाचेक पायली शेंगे फोडूक घेतलंय. यंदा एकच कोपरो केलंय भयमूग. परत भाड्याचो पावरट्रीलर करून भयमूग पेरून घेतलंय खरो, नि दुसऱ्या दिसापासून पावसान ह्यो हुदुदो केल्यानहा. भयमूग रुजलो काय बघूसाठी जायन त पावस घराच्या भायर पडाक देणा नाय. काय करशीत, कल सतलो म्हणा हुतो, म्हातारे भयमूग गेलो व्हावान. झालो आसतो सुमाराकसो भयमूग त तुझ्या पोरांका शेंगे गावले आसते ना. सतलो म्हशीक घेवन पावसाच्या हुदुद्यातनाच जाता. तसो तो काय खोटा बोलाचो नाय. पण आता भयमूगाचो विषय मनात्सून काढून टाकलंय बाबू. परवा भरडाचे चार कुणगे लावन घेतलंय. पावसान त बाबा नुसती इटमना केल्यानहा. काय कामां करतलं नि कशी करतलं? कल असगो सांगा हुतो, पावसाफुडे श्यानपाण नायसा झाला. पुरी भाटी पंधरा दिस पाणयाखाली हा. लावणेसाठी तयार केलल्या चिखलात्सून परवा असगो पळान घराक इलो. चिखल करून लावक सुरुवात केल्यान नि अचानक होवराचा पाणी फाळयेत घुसला. ह्या कंबारभर पाणी झाला ! तरव्याची सगळी वझी व्हावान गेली. होवूर बघून असगो नि संगला जाॅत घेवन घराक पळाली. लावलली भातां व्हावान, कुसान गेली. लाॅक म्हणतंत, गाववाल्यांक शेती करूक नको. बसान खावक होया, निसर्ग इतको कोपलो हा सध्या कशी म्हणान शेती करतलास सांगा.
माझा ना डोक्या जाम झालाहा बाबू. निसर्ग कोपलो कशान इतको ? होवूर काय, पावस काय, थंडी काय, कसले कसले रोग काय, कसले ते इषाणू काय नि कोरोना काय, देवान काय येवजल्यानहा ताच काय कळना नाय. आता ह्यो पावसाचो हुदुदो! माणसान जगाचा तरी कसा रे? सगळी कौला गळतंत, फत्रे गळतंत, जमीन उंबाळलीहा, सुडकी सुकनंत नाय चार चार दिस, पावसाच्या हुदुद्यात हांडोभर पाणी आणूक गावना नाय पोखरावरसून. जन्याच्या दुकानात्सून चार जिन्नस आणूचा श्यानपाण नाय, चिटकेची, भेंड्यांची, मिरशाग्यांची सगळी ढाकां आडवी झाली. पडवळ्याच्या येलींचे तागूर कुसले. पावस खुळावलोहा, डोळे ढापून वत्ताहा !
- बाबू घाडीगावकर, जालगाव, दापोली