राजापूर तालुक्यातील खाड्या गाळाने भरल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:40+5:302021-04-07T04:31:40+5:30
राजापूर : तालुक्यातील नाणार-सागवे भागातील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने येथील मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
राजापूर : तालुक्यातील नाणार-सागवे भागातील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने येथील मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गाळामुळे खाडीत होड्या ढकलणे अथवा किनाऱ्यावर होड्या ओढताना मच्छिमारांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खाडीतील गाळ उपसा करावा, अशी मागणी येथील मच्छिमारांतून करण्यात येत आहे.
राजापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. ब्रिटिश काळामध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीद्वारे व्यापारउदीम चालत होता. मोठमोठ्या गलबतांद्वारे याठिकाणी जलवाहतूक केली जात असे. मात्र, कालांतराने खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने व दळणवळणाची अन्य साधने निर्माण झाल्याने जलवाहतूक बंद झाली. त्यामुळे खाडीपट्ट्यातून होणारी जहाजांची ये-जा ही सद्यस्थितीत बंद आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेला मच्छिमार व्यवसाय अद्यापही याठिकाणी सुरू आहे. मात्र खाडीपट्ट्यात साचलेल्या गाळामुळे मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.
हीच अवस्था विजयदुर्ग खाडीपट्ट्यामध्ये येणाऱ्या राजापूर तालुक्यातील नाणार-सागवे येथील खाडीची झाली आहे. या खाडीकिनारी तालुक्यातील सागवे, कातळी, नाणार आदी भाग आहे. या भागातील सुमारे साडेतीन-चार हजार लोकांचा उदरनिर्वाह मच्छिमारी व्यवसायावर आहे. याठिकाणी सुमारे तीनशे ते चारशे मच्छिमार होड्या आहेत. खारेपाटण भागातून वाहणाऱ्या नद्या सागवे येथे अरबी समुद्राला मिळतात. या नद्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. गेली वर्षानुवर्षे अशाप्रकारे गाळ खाडीकिनारी येत असल्याने खाडीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाले आहे.
किनारपट्टी भागात साचलेल्या गाळाचा फटका येथील मच्छिमारांना बसत आहे. मच्छिमारीकरिता होड्या खाडीत लोटताना, तसेच मच्छिमारी करून परतल्यानंतर किनाऱ्यावर होड्या ओढताना मच्छिमारांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीपट्ट्यात साचलेला गाळ लवकरात लवकर उपसावा, अशी मागणी येथील मच्छिमारांतून केली जात आहे.