‘त्यां’नी दिलेल्या प्लास्टिकमुळे झाले मृतदेहावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:19+5:302021-04-28T04:34:19+5:30
दापोली / शिवाजी गोरे : काेराेनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकचा तुटवडा जाणवल्याने मृतदेह बराच वेळ ...
दापोली / शिवाजी गोरे : काेराेनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकचा तुटवडा जाणवल्याने मृतदेह बराच वेळ जागेवरच ठेवण्याची वेळ दापाेलीतील रुग्णालयात घडली. लाॅकडाऊनमुळे प्लास्टिकचा तुटवडा जाणवत असतानाच जालगाव (ता. दापाेली) येथील उद्याेजक सुधीर तलाठी मदतीला धावून आले. त्यांनी काेणत्याही माेबदल्याची अपेक्षा न ठेवता ५० मीटर प्लास्टिक दिले आणि अजूनही लागले तर सांगा, पुरवू, असेही सांगितले.
दापोली तालुक्यात कोरोनाने रोज एक ना दोन रुग्णांचा मृत्यू होत आहे. या मृत रुग्णांचे शव आच्छादित करण्यासाठी प्रशासनाकडून प्लास्टिक बॅगचा पुरवठा केला जाताे. परंतु सध्याच्या परिस्थितीत या प्लास्टिक बॅगचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे काहीवेळेला अंत्यसंस्कारही करण्याचे थांबते. दापाेलीत एका रुग्णाचा काेराेनाने मृत्यू झाला. मात्र, प्लास्टिक बॅगचा तुटवडा भासल्याने डॉ. महेश भागवत यांच्यासमाेर प्रश्न पडला. त्यांनी भाऊ इदाते यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. भाऊ इदाते यांनी ओम प्लास्टिकचे मालक सुधीर तलाठी यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती सांगितली.
सुधीर तलाठी यांनी ‘जितके लागेल तितक्या प्लास्टिकचा पुरवठा मी करीन’, असे सांगितले. त्यांनी डॉ. महेश भागवत यांच्याकडे सुमारे ५० मीटर प्लास्टिक सुपुर्द केले. तसेच देव करो आणि अशी वेळ येऊ नये; परंतु कधीही आणि कितीही प्लास्टिक लागले तरी सांगा; मी पुरवठा करीन. जर अगोदर आकार सांगितला तर त्या आकाराप्रमाणे प्लास्टिक बॅग करून देण्याचीही आपण व्यवस्था करू, असे सुधीर तलाठी यांनी सांगितले. तसेच सरकारी दवाखान्याबरोबरच आवश्यकता भासल्यास खासगी दवाखान्यांनाही प्लास्टिकचा मोफत पुरवठा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. डाॅ. महेश भागवत यांनी प्लास्टिकचे विचारलेले पैसेही घेण्यास त्यांनी नकार दिला.
बऱ्याच जणांकडे पैसे असतात; परंतु समाजासाठी काही करण्याची दानत अथवा नियत नसते. ती दानत, ती नियत सुधीर तलाठी यांच्यासारख्या काही मोजक्याच व्यक्तींकडे असते. कोणताही बडेजाव न करता त्यांनी दाखविलेल्या दातृत्वाचे काैतुक हाेत आहे.