चिपळुणातील तीन दुकानदारांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:33 AM2021-05-07T04:33:12+5:302021-05-07T04:33:12+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील तीन व्यापाऱ्यांवर येथील पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही या पद्धतीने कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. मोहन विष्णू चोचे (रा. वाणी आळी), नितीन दत्ताराम लोकरे (रा. परांजपे स्कीम, बहादूरशेख नाका, चिपळूण), संतोष धोंडू पेढांबकर (रा. काविळतळी, जिव्हाळा मार्केट, चिपळूण) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त दुकाने उघडली ठेवल्यास कारवाई केली जात आहे. त्यानुसार दुकानदार चोचे यांचे शहरातील बहादूरशेख नाका येथे मुंबई-गोवा महामार्गालगत संगम पान शॉप व जनरल स्टोअर्स असून, बुधवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी दुकान उघडे ठेवले होते. तसेच नितीन लोकरे यांचे शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील एक्सेसरीजचे दुकानही उघडे होते, तर शहरातील काविळतळी येथील जिव्हाळा सुपर बाजार येथे शटर बंद ठेवून आतमध्ये पाच महिला कर्मचारी व चार ग्राहक खरेदी करताना आढळल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल उदय भोसले यांनी दिली आहे.
................................
अत्यावश्यक सेवा ११नंतर बंद म्हणजे बंदच
चिपळूण बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून बाजारपेठेत पाहणी केली. यावेळी अत्यावश्यक सेवेत नसलेली अनेक दुकाने उघडी दिसली. अशा दुकानदारांचा कडक शब्दात समाचार घेतला. तसेच अत्यावश्यक सेवा ११ वाजेपर्यंत आणि इतर दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याच्या सक्त सूचना केल्या. गोवळकोट रोड येथील दुकानांचीही पाहणी करून कडक सूचना दिल्या.