साेन्याच्या बांगड्या चाेरीप्रकरणी महिलेवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:37 AM2021-08-25T04:37:00+5:302021-08-25T04:37:00+5:30
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृद्धेच्या हातांमधील सोन्याच्या ८८ हजार रुपये किमतीच्या बांगड्या लांबविल्याप्रकरणी कंत्राटी ...
रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या वृद्धेच्या हातांमधील सोन्याच्या ८८ हजार रुपये किमतीच्या बांगड्या लांबविल्याप्रकरणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २३) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडली होती.
स्मिता प्रफुल्ल सावंत (वय ३२, रा. पाली, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मृत सुलोचना पाटील यांची नात समीक्षा पाटील हिने अर्जाद्वारे जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले-गावडे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या आजीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या दिसल्या नाहीत. याबाबत त्यांनी तक्रार केली हाेती. या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी चौकशी केल्यानंतर स्मिता सावंत हिने बांगड्या चोरल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार उघड झाल्यानंतर महिलेला नोकरीवरून निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी आता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत.