तापमान वाढीमुळे भात पिकांवर लष्करी अळींचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:35 AM2021-08-13T04:35:58+5:302021-08-13T04:35:58+5:30
दापाेली : सद्य:स्थितीमध्ये कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे तापमानामुळे वाढ झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे काही ...
दापाेली : सद्य:स्थितीमध्ये कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे तापमानामुळे वाढ झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी सुरळीतील अळी व निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव हाेऊ लागला आहे. तसेच हे वातावरण पुढे काही दिवस कायम राहिल्यास लष्करी अळींचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जागृत राहून भात शेतीचे नियमित सर्वेक्षण करावे तसेच कीडनिहाय उपाययोजना कराव्यात, अशी सूचना काेकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.
सुरळीतील अळीमुळे नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चूड आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी शेतात पाणी बांधून ठेवावे आणि २० मिली रॉकेल पाण्यात सोडावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात आणि कीड गुदमरून मरते. शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात. याशिवाय गरज असल्यास व आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव असल्यास फेनथोएट पाण्यात मिसळून फवारणी करावी.
निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव भात खाचरामधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सखल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पाहणी करावी पुनर्लागवडीच्या वेळेस १ निळा भुंगेरा किंवा प्रादुर्भित पान प्रति चूड व फुटव्याच्या अवस्थेत ९ भुंगेर किंवा ९ ते २ प्रादुर्भित पाने प्रति चूड आढळल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे असे समजावे.
सद्य:स्थितीत अधून मधून पडणारा पाऊस आणि वाढते तापमान या बाबी लष्करी अळीच्या वाढीस अनुकूल असल्याने या अळींचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तरी प्रादुर्भाव सुरू झाल्यास ज्या भातशेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणी प्रादुर्भावित भात शेतामध्ये पाणी बांधून ठेवावे. जेणेकरून अळ्या जमिनीत किंवा चुडामध्ये न लपता रोपांवर आल्याने पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतील तेव्हा त्याकरिता भात शोतीमध्ये पक्षी थांबे उभारावेत. किडींचा उद्रेक झाल्यास अशा ठिकाणी भातशेतीच्या भोवती चर खोदून पाणी भरून ठेवावे म्हणजे अळ्यांचे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये स्थलांतर होणार नाही.