रत्नागिरी जिल्ह्यावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:20 AM2021-07-23T04:20:03+5:302021-07-23T04:20:03+5:30

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या ...

Crisis over Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यावर अस्मानी संकट

रत्नागिरी जिल्ह्यावर अस्मानी संकट

Next

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. चिपळुणात कोळकेवाडी धरणाचा विसर्ग पहाटे केल्याने चिपळुणातील पूरस्थिती गंभीर झाली असून, बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफची टीम तातडीने दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने नागरिकांसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळपासून पावसाची जिल्ह्यात रिपरिप सुरू होती. मात्र, रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस पडू लागल्याने चिपळूण येथील कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे पहाटे ३ वाजता या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे ढगफुटीसदृश पाऊस आणि या विसर्गामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आला असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चिपळूण आणि खेड या शहर आणि परिसर जलमय झाले आहेत. एनडीआरएफची टीम आणि स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गड नदीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्ट्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसले होते. दत्तमंदिर नदीलाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीमध्येही पाणी घुसले. यामुळे खाडी भागातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माखजन बाजारपेठेतही सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सततच्या पावसामुळे गडगडी धरण येथील कालव्याची भिंत वाहून गेली आहे.

राजापूर तालुक्यातही सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसदृश स्थिती आहे. राजापूर तालुक्यात गेले दोन आठवडे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहराला पुराचा वेढा कायम आहे. या दोन आठवड्यांत जवळपास चारवेळा पुराचे पाणी जवाहर चौकाच्यावर आले आहे. बारा दिवस चिंचबांधवरचा पेठ रस्ता तसेच जवाहर चौकातील नदी किनाऱ्यालगतच्या टपऱ्या पुराच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या गावांना देखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका चांदेराईए तोणदे गावालादेखील बसला असून अनेक घरातून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे आता गावाचा रस्ते मार्गाने होणारा संपर्क तुटला आहे. बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहत केली आहे. या भागातील जवळपास १५ फुटांपेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. टेंभ्ये बाैद्ववाडी येथील आशा प्रदीप पवार (वय ५५ वर्षे) ही महिला गुरुवारी सकाळी लसीकरणासाठी निघाली असता अडकरवाडी येथील पऱ्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र, अधूनमधून रिपरिप सुरूच होती.

Web Title: Crisis over Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.