धरणात पाणी असूनही पाणीटंचाईचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:32 PM2020-11-10T15:32:07+5:302020-11-10T15:33:23+5:30
dam, water shortage, Ratnagiri , Rajapur धरणे बांधून पूर्ण आहेत, आतमध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभरही पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे निधीची तरतूद नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे. मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थिती आहे. मात्र, शासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने धरणात पाणी असूनही राजापूरच्या जनतेवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
राजापूर : धरणे बांधून पूर्ण आहेत, आतमध्ये तुडुंब पाणीसाठा आहे. मात्र कालव्यांचा पत्ताच नसल्याने तालुक्यातील भातशेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी एक टिपूसभरही पाणी जनतेला मिळत नाही तर दुसरीकडे निधीची तरतूद नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. परिणामी तालुक्यातील जनतेला दरवर्षी उग्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे विदारक चित्र राजापूर तालुक्याचे आहे. मागील काही वर्षे तालुक्याची अशीच स्थिती आहे. मात्र, शासनाकडून त्याबाबत ठोस उपाययोजना होत नसल्याने धरणात पाणी असूनही राजापूरच्या जनतेवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षात या परिसरात अनेक धरणे बांधली. त्यामध्ये अर्जुना नदीवर अर्जुना खोरे प्रकल्प, पाचल दिवाळवाडी, तळवडे, परुळे, ओझर, ताम्हाने, वाळवड, केळवली, कळसवली, वाटूळ, काजिर्डा, जामदा प्रकल्प, जुवाटी, कोंड्ये, पांगरे, चिखलगाव यांचा सामावेश आहे. त्यापैकी काही धरणे बांधून पूर्ण आहेत, तर निधी नसल्याने काही धरणे अपूर्णावस्थेत आहेत. आजवर या सर्व धरणांवर अब्जावधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, एवढा खर्च होऊनही समस्त जनतेला पाणी मिळालेले नाही, हेच सत्य अधोरेखित ठरले आहे. तालुक्यात अर्जुना व जामदा असे दोन मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी अर्जुना धरण पूर्ण आहे. आता केवळ पाईपलाईन टाकायची बाकी आहे. तर गेले सहा, सात वर्षे जामदा खोरे प्रकल्प रखडला आहे. यापूर्वी झालेल्या सिंचन घोटाळ्यात जामदा प्रकल्प सापडल्याने त्याची चौकशी सुरु असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे जामदाचे काम सुरु झालेले नाही.
तालुक्यात पाचल दिवाळवाडीसह ओझर तळवडे, पाचल येथील धरणे बांधून अनेक वर्षे झाली. मात्र, एवढ्या वर्षात त्या धरणातून कालवेच न काढल्याने धरणातील तुडुंब साचलेला पाणीसाठा कायम राहतो. तालुक्यातील पूर्ण बांधण्यात आलेल्या धरणांची अशी स्थिती आहे. काही धरणात गाळ साचला आहे. तळवडे धरणातून तर पाणी झिरपत असते. धरणाला गळती लागली आहे. पाचलच्या धरणातून तर एकदा तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडत होते. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. नंतर त्या धरणाची भिंत पाडून नव्याने बांधली गेली होती. त्यानंतर धोका टळला असला तरी आतील पाण्याचा भातशेतीसाठी वापर होत नाही असेच चित्र आहे.
शासनाच्या मूळ उद्देशाला तडाच
तालुकावासियांना भातशेतीसह पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने शासनाने धरणे बांधली. मात्र, आज एकूणच या धरणांची स्थिती पाहता शासनाच्या मूळ उद्देशाला तडा गेला आहे, अशी तालुक्यातील धरणांची अवस्था बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई कायम आहे. याबाबत शासनाने तालुक्यातील धरणांचा आढावा घ्यावा. अपूर्ण धरणे बांधून पूर्ण करावीत व सर्व धरणातून समस्त शेतकरी बांधवांसह जनतेला मुबलक स्वरुपात पाणी मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे .