'माझ्या आई-वडिलांवर केलेली टीका मनाला लागलीय, संबंधितांना...' उदय सामंतांचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:55 PM2022-08-20T20:55:09+5:302022-08-20T20:55:36+5:30
Crime News: माझ्या आईवडिलांवर झालेली टीका मला लागली. त्याचे उत्तर संबंधितांना एप्रिल २०२४ च्या निवडणुकीतच उत्तर देईन, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता दिला.
रत्नागिरी - वेगळी भूमिका घेतल्यानंतर माझ्यावर खूप टीका झाली. त्याला मी भीक घालत नाही. मात्र माझ्या आईवडिलांवर झालेली टीका मला लागली. त्याचे उत्तर संबंधितांना एप्रिल २०२४ च्या निवडणुकीतच उत्तर देईन, असा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खासदार विनायक राऊत यांचे नाव न घेता दिला. जर हे उत्तर मी दिले नाही तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असेही ते म्हणाले.
रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे शुक्रवारी रात्री दहीहंडी कार्यक्रमात ते बोलत होते. रत्नागिरी जिल्ह्यात एकही तरुण, तरुणी बेरोजगार राहणार नाही, अशी ग्वाही देतानाच त्यांनी विविध प्रकल्प कोकणात आणण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमात गुवाहाटी दौऱ्याचा उल्लेख झाला. तो धागा पकडून मंत्री सामंत म्हणाले की, मी गुहावाटीला जाताना एकट्याने गेलो. कळपाने गेलो नाही. जाण्याच्या आधी चार दिवस मी जोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून काही निष्पन्न होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मी गुवाहाटीला गेलो.
शिंदे यांना लांब ठेवले
आपल्याला ठाकरे कुटुंबाबद्दल आजही नितांत आदर आहे. गुहावाटीला जाण्याआधी आपण कोणीही तुटू नये, यासाठी प्रयत्न करत होतो. एकनाथ शिंदे यांच्यासारखा चांगला माणूस जाता नये, असे मी परोपरीने समजावत होतो. मात्र पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या काही लोकांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे यांच्यापासून लांब ठेवले. त्यांना भेटूच दिले नाही, असा आरोपही मंत्री सामंत यांनी केला.