खेडच्या पर्यटनात भर टाकणारा क्रोकोडाईल पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:20 AM2021-07-12T04:20:01+5:302021-07-12T04:20:01+5:30

खेड : मुंबई - गोवा महामार्ग, रेल्वे स्थानक तर ऐतिहासिक बंदर अशा तिन्हीप्रकारे जगाशी जोडले गेलेले खेड शहर पर्यटकांसाठी ...

Crocodile Park, a tourist attraction in Khed | खेडच्या पर्यटनात भर टाकणारा क्रोकोडाईल पार्क

खेडच्या पर्यटनात भर टाकणारा क्रोकोडाईल पार्क

Next

खेड : मुंबई - गोवा महामार्ग, रेल्वे स्थानक तर ऐतिहासिक बंदर अशा तिन्हीप्रकारे जगाशी जोडले गेलेले खेड शहर पर्यटकांसाठी चांगले ‘डेस्टिनेशन’ बनू शकते. मुंबई, पुणे या महानगरांपासून सुमारे २०० किलाेमीटर दूर असलेल्या खेड शहराच्या पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. क्रोकोडाईल पार्कच्या निमित्ताने खेडमधील पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सन २००९मध्ये प्रथमच जगबुडी नदीत क्रोकोडाईल पार्क, बोटिंग क्लब व गेस्ट हाऊस हा सामायिक प्रकल्प राबविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न सुरु केले. त्यांनी १६ जुलै २०१९ रोजी सहाय्यक पत्तन अभियंता, दापोली व मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष स्थळपाहणी केली होती. त्यानंतर रत्नागिरी येथील पत्तन विभागाने तातडीने सुमारे दीड कोटी रुपयांचे अंदाजपत्रकही बनवले होते. त्यानंतर आता आमदार योगेश कदम यांनी या प्रकल्पाचा शासनस्तरावर नोव्हेंबर २०१९पासून पुन्हा पाठपुरावा सुरू केला आणि त्याला यश आले.

खेड नगर परिषदेने पाठवलेल्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून, नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा निधी वितरीत करताना जिल्हाधिकारी नियंत्रक म्हणून काम पाहणार आहेत. तर कार्यान्वयन यंत्रणा नगर परिषद प्रशासन राहणार आहे.

या प्रकल्पांतर्गत सुसज्ज बोटिंग सुविधा, दोन मजली गेस्ट हाऊस, जिम्नॅशियम क्लब, चेंजिंग रूम, पार्किंग सुविधा, जेटी, योग हॉल व संपूर्ण प्रकल्पाला दगडी संरक्षक भिंत आदी कामे प्रस्तावित केली आहेत. या प्रकल्पांतर्गत पर्यटकांना सुरक्षितपणे मगरींचे ठराविक अंतरावरून दर्शन घेता येणार आहे. संपूर्ण कोकणात प्रथमच अशाप्रकारचा नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्य शासनाच्या शंभर टक्के अनुदानातून खेड नगर परिषद राबविणार आहे. दापोलीत पर्यटनासाठी जाणाऱ्या पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना खेड शहरात काही काळ थांबण्यासाठी नक्कीच या प्रकल्पाचा उपयोग हाेणार आहे.

------------------------------------

पूर्वेकडील भाग आजही दुर्लक्षित

गेल्या काही वर्षांत कोकणात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मात्र, समुद्र किनाऱ्यांवर काही प्रमाणात पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्या तरी पूर्वेकडील सह्याद्री पर्वताच्या भागात अजूनही कोणत्याही प्राथमिक सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. खेड तालुक्यात प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक गड, किल्ले यांना चांगली पर्यटनस्थळे म्हणून विकसित करणे आवश्यक आहे.

----------------------------

पर्यटनाचा खजिना

खेड शहरातच असलेल्या गरम पाण्याचे झरे, प्राचीन बौद्ध लेणी पर्यटकांना आकर्षित करतात. शहराला लागूनच जगबुडी व नारंगी या दोन नद्या वाहतात. या दोन्ही नद्यांचा संगम देवणे बंदराजवळ होतो. या संगमाजवळ तयार झालेल्या डोहात नैसर्गिक अधिवासात शेकडो मगरी मुक्तसंचार करतात. पर्यटकांना प्रत्यक्षात या मगरी जवळून व सुरक्षितपणे पाहण्याची संधी केवळ जगबुडी नदीत मिळू शकते.

Web Title: Crocodile Park, a tourist attraction in Khed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.