जगबुडी नदीत होणार क्रोकोडाइल पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:20 AM2021-07-09T04:20:41+5:302021-07-09T04:20:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : निसर्गरम्य बेटावर क्रोकोडाइल पार्क आणि बोट क्लब उभारण्यासाठी राज्य शासनाने ९ कोटी रुपयांच्या निधीला ...

Crocodile Park will be on the Jagbudi River | जगबुडी नदीत होणार क्रोकोडाइल पार्क

जगबुडी नदीत होणार क्रोकोडाइल पार्क

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खेड : निसर्गरम्य बेटावर क्रोकोडाइल पार्क आणि बोट क्लब उभारण्यासाठी राज्य शासनाने ९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असल्याने खेडवासीयांचे बोट क्लब आणि क्रोकोडाइल पार्कचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे. जगबुडी नदीवरील देवणे बेट पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे ही राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची संकल्पना असून, ही संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता.

याबाबत माहिती देताना आमदार योगेश कदम यांनी सांगितले की, कोकण हा निसर्गसमृद्ध प्रदेश असल्याने इथे पर्यटनाला मोठा वाव आहे. खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीचा किनाराही असाच निसर्गरम्य आहे. येथील देवणे या बेटाजवळ असलेल्या डोहामध्ये मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून, येथील खडकावर या मगरी बिनधास्तपणे पडलेल्या पाहावयास मिळतात. या निसर्गरम्य बेटाचा पर्यटनदृष्ट्या विकास करून या ठिकाणी कोकणच्या पर्यटनात भर पडेल असे क्रोकोडाइल पार्क आणि बोट क्लब उभारावे, अशी संकल्पना माजी पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडली होती. याबाबतचा आवश्यक तो प्रस्ताव तयार करून निधी मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला होता.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सततचा पाठपुरावा केल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या ९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, या माध्यमातून खेडमध्ये पर्यटन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना राहण्यासाठी गेस्ट हाउस उभारले जाणार असून, या ठिकाणी बोटिंगची सुविधा असणार आहे. देवणे डोहामध्ये विहार करणाऱ्या मगरींचे पर्यटकांना सुरक्षितपणे दर्शन घडविले जाणार असून, नदीपात्राचेही सुशोभीकरण केले जाणार असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले. जगबुडी नदीवरील देवणे बेटाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, या ठिकाणी बोट क्लब आणि क्रोकोडाइल पार्क व्हावे हे खेडवासीयांचे स्वप्न होते. राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने या कामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने खेडवासीयांनी उराशी बाळगलेले हे स्वप्न अखेर साकार झाले आहे.

--

Web Title: Crocodile Park will be on the Jagbudi River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.