चिपळुणात भरवस्तीत आढळल्या मगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:21 AM2021-06-21T04:21:30+5:302021-06-21T04:21:30+5:30
चिपळूण : शहरातील देसाई मोहल्ला व पेठमाप फरशी तिठा परिसरात दोन मगरींना वन विभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात ...
चिपळूण : शहरातील देसाई मोहल्ला व पेठमाप फरशी तिठा परिसरात दोन मगरींना वन विभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. मात्र, भरवस्तीत मगरी सापडल्याने चिपळूणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरात भरवस्तीत मगरी सापडण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा शनिवारी देसाई मोहल्ला येथील गटारात मगर आढळली. याची माहिती येथील नागरिकांनी वन विभागाला दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कीर, वनपाल किशोर पत्की, वनरक्षक दत्तराम सुर्वे, राजाराम शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत ही मगर नऊ फूट लांबीची व सुमारे ५० किलो वजनाची असल्याचे समोर आले आहे. ही घटना ताजी असतानाच पेठमाप फरशी तिठा परिसरात एका घराच्या मागे मगर आढळून आली. याची माहिती वन विभागाला दिली. वन विभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत या मगरीला सुरक्षितरीत्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. एकंदरीत एकाच दिवशी दोन मगरी शहरात भरवस्तीत सापडल्याने चिपळूणवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
-----------------------
चिपळूण शहरात आलेल्या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात साेडून देण्यात आले.