लोटेतील गो-शाळा बंदचा कुटिल डाव, भगवान काेकरेंचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 05:41 PM2022-09-28T17:41:43+5:302022-09-28T17:42:10+5:30
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवासंस्थानतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते
चिपळूण : श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम सेवासंस्थानतर्फे लोटे येथे गोशाळा चालवली जाते. सुमारे १ हजार गायींचे येथे सामाजिक जाणिवेतून पालनपोषण नियमितपणे सुरू आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून गो-शाळेविरोधात तक्रारींचा सिलसिला सुरू झाला आहे. लोटे पंचक्रोशीतील लोकांना गो-शाळेविरोधात जाणीवपूर्वक भडकावले जात असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष भगवान कोकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोटे येथील गो-शाळेतील मल-मुत्राचे पाणी ओढ्यात जाते. येथील जनावरांना, शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचा आरोप करून लोटे पंचक्रोशीतील काही पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको तसेच गोशाळा उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला आहे. यावर भगवान कोकरे महाराज म्हणाले की, सेवाभावी हेतूने संस्थेतर्फे लोकांनी सोडून दिलेल्या गायी, म्हशींचे संगोपन केले जाते. गो-शाळेच्या प्रकल्पाला लोटेतील जमीन मिळण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना काळात बिकट परिस्थितीत जनावरांची जपणूक केली. गोशाळा हा आपला व्यवसाय नसून कीर्तनातून मिळणारे मानधन गो-शाळेसाठी खर्च करतो. ७५ लाखांचे शासकीय अनुदान मिळाले. जनावरांच्या संगोपनासाठी तो कशा पद्धतीने खर्च झाला. त्याचा लेखी अहवालही शासनाला दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
गो-शाळा हलवा नाही तर तेथील बांधकाम तोडून टाकू, अशाही धमक्या दिल्या जात आहेत. तक्रारीवर शासकीय पातळीवर कोणतीही चौकशी झाली तरी त्यास आपण सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. गो-शाळेविरोधात केवळ राजकारण केले जात आहे, असा आराेप भगवान कोकरे महाराजांनी केला आहे.