Ratnagiri: पावसाअभावी पिके सलाईनवर, शेतकऱ्यांचे स्वप्न करपणार
By मेहरून नाकाडे | Published: September 2, 2023 06:33 PM2023-09-02T18:33:30+5:302023-09-02T18:37:13+5:30
ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता
रत्नागिरी : पावसाने दडी मारल्याने पावसाअभावी जिल्ह्यातील पिके सध्या सलाईनवर असून पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांचे स्वप्न करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला असला तरी अन्यत्र मात्र शनिवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. वरकस व कातळावरील भात पिके पाण्याअभावी पिवळी पडली आहेत.
यावर्षी एकूणच पाऊस कमी झाला आहे. जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उदिद्ष्ट असताना ६१ हजार २४९.१३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड करण्यात आली आहे. नाचणी लागवड १० हजार ३९८ .२१ हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित असताना प्रत्यक्ष लागवड ९३७९.६८ हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली आहे. तृणधान्य, तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्य पिकाखालील लागवडही पावसाअभावी कमी झाली आहे. जिल्ह्यात ७९ हजार ८७१ .६५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट असताना ७१ हजार ११.०९ लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या लांबल्या शिवाय पावसावर ८२ टक्के लागवडीची कामे पूर्ण झाली. परंतु नंतर पाऊस गायब झाल्याने प्रत्यक्ष लागवड कमी झाली आहे.
गेले काही दिवस कडकडीत उन पडत असल्याने भात खाचरे कोरडी पडली आहेत. नदीकाठच्या खाचरातीलही ओलावा नष्ट झाला आहे. मात्र वरकस व कातळावरील लागवडीला चांगलाच फटका बसला आहे. पावसाअभावी उन्हामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होऊन जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडली आहेत. पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. काही भागात हळवे भात प्रसवले आहे. तर काही भागात फुलोरा स्वरूपात आहे.
पावसाअभावी फुलोरा वाळण्याचा धोका आहे. शिवाय ढगाळ हवामानामुळे कीडरोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे. कडकडीत उन्हामुळे काही ठिकाणी करपा रोग पडला आहे. काही ठिकाणी पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, तपकिरी तुडतुड्यांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे.
काही तालुक्यात भात, नाचणी पिकावर करपा रोग पडला आहे. सध्या पिकांसाठी पाऊस गरजेचा आहे. पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांनी जमेल तसे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करून कीडरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. - सुनंदा कुऱ्हाडे, कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.