कोटीची फसवणूक; गुहागरातील दोघा बिल्डर्संना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 07:39 PM2019-06-06T19:39:28+5:302019-06-06T19:40:40+5:30
गुहागर शहरात सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष पवार याला चिपळूण येथून तर दिपक पवार याला शृंगारतळी येथून गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.
गुहागर : गुहागर शहरात सदनिका बांधून देतो म्हणून तब्बल १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये स्विकारून फसवणूक केल्याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष पवार याला चिपळूण येथून तर दिपक पवार याला शृंगारतळी येथून गुहागर पोलिसांनी अटक केली आहे.
दादर मुंबई येथील पल्लवी सुरेश हेदवकर यांनी याबाबत फिर्याद दाखल केली होती. यामध्ये पवार बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सने सदनिका बांधून देतो म्हणून आमच्याकडून रुपये १ कोटी १ लाख ४० हजार ३६९ रुपये घेतले. ही सदनिका मुदतीमध्ये बांधून देणार होते. मात्र साठेकरार पत्राप्रमाणे व बुकींगप्रमाणे सदनिका न देता आमचा विश्वासघात केला. एवढेच नाही तर त्यांनी घेतलेले पैसेही दिले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले होते.
याप्रकरणी गुहागर पोलिसांनी पवार बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्सचे भागिदार दिपक काशिराम पवार, संतोष बावकृष्ण पवार, बाळकृष्ण रामचंद्र पवार, शिवानी संतोष पवार, स्नेहा संतोष पवार, (पवारसाखरी, गुहागर), चकोर रामचंद्र्र राऊत (विरार, पालघर), संघमित्रा जितेंद्र्र पवार (काळाचौकी मुंबई), दिनेश विनायक पवार, (पवारसाखरी-गुहागर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान ४२०, ४१८, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील या आठजणांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान यातील काही आरोपींनी नी खेड येथील न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याठिकाणी अर्ज फेटाळला गेला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. त्याठिकाणी पवार बिल्डर्सचे प्रमुख संतोष बावकृष्ण पवार व दिपक काशिराम पवार या दोघांचा अटकपूर्व जामिन फेटाळला गेला.
संतोष पवार हा चिपळूण येथे येणार असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याला चिपळूण येथून ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री १० वाजता शृंगारतळी येथून दिपक पवार याला अटक केली.