खेडमध्ये पावणेतीन कोटींचे नुकसान

By admin | Published: September 25, 2016 12:57 AM2016-09-25T00:57:36+5:302016-09-25T00:57:36+5:30

पावसाचा जोर कमी : कुंभार्ली घाटातही दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक संथ गतीने

Crores of losses in villages | खेडमध्ये पावणेतीन कोटींचे नुकसान

खेडमध्ये पावणेतीन कोटींचे नुकसान

Next

रत्नागिरी : दोन दिवस कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पडझडीच्या तसेच रस्ते खचण्याच्या घटना घडल्या आहेत. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने १२९ दुकानांचे २ कोटी ८६ लाखांचे नुकसान झाले आहे. तर संगमेश्वरातील सोनगिरी नदीचा प्रवाह बदलल्याने या भागातील घरांना धोका निर्माण झाला आहे. शनिवारी पावसाचा जोर थोडासा कमी झाल्याने खेडमधील जगबुडी, नारिंगी आणि चोरद नदीचे पाणी ओसरू लागले आहे. चिपळूणमधील परशुराम तसेच कुंभार्ली घाटात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी शहरातील भाट्ये किनाऱ्यावर एक मृतदेह आढळून आला.
शुक्रवार सकाळपासून शनिवार सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ९७० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी १०७ मि.मी. (सुमारे ४ इंच) पाऊस जिल्ह्यात पडला आहे. गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही सर्वांत जास्त पाऊस खेड तालुक्यात पडला आहे. शनिवारी मात्र सर्वच भागांमधील पावसाचा जोर कमी झाला आहे. शुक्रवारी रात्री ९.१५ च्या सुमारास परशुराम घाटात तिसऱ्यांदा दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पुन्हा थांबवण्यात आली. दरड बाजूला करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. पहाटेपर्यंत येथून एकेरी वाहतूक सुरू केली. जगबुडी नदी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. एकीकडे परशुराम घाटातील वाहतुकीला ब्रेक लागलेला असताना दुसरीकडे मध्यरात्री चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली. त्यामुळे हा मार्गही ठप्प झाला. परशुराम घाटात वाहतूक खोळंबून राहू नये, यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या कुंभार्ली घाटातून वळवण्यात आल्या होत्या. मात्र, तेथेही दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. शनिवारी दुपारी १२च्या सुमारास ही वाहतूक पूर्ववत झाली. अर्थात तेथेही एकेरी वाहतूकच सुरू आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड तालुक्यात झाले आहे. खेड बाजारपेठेत पाणी घुसल्याने १२९ दुकानांचे २ कोटी ८६ लाखांचे नुकसान झाले आहे. चिपळूणमधील कुर्ली (धनगरवाडी) येथील अंतर्गत रस्ता खचला असून, खेरशेत येथे साकव कोसळला आहे.
मंडणगड तालुक्यात आंबवली येथील दीपक रहाटे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले असून, वेलोते येथील सीताराम भगते, कोंडगाव येथील रमेश रेवाळे यांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. राजापूर तालुक्यातील केळवली (निखारेवाडी) येथील विलास खाडे यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच धाऊलवल्ली येथे एका घराच्या पडवीची भिंत कोसळली आहे.
जिल्ह्यात दापोली तालुक्यातील कोंडे (कदमवाडी) येथील राजाराम कदम यांचा बैल पुराच्या पाण्यात वाहून गेला. तर मांदवली येथील अनंत भानत यांच्या घरामध्ये नदीचे पाणी घुसले. गुहागर तालुक्यातील वेलदुरे येथील शंकर कोळथनकर यांच्या घराचे अंशत: तर अंजनवेल येथील एका घराचे पूर्णत: नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखणी येथील सीताराम महाडिक यांच्या घराचे अंशत: नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातही पेठकिल्ला, कोळंबे, शिरगाव येथेही अंशत: नुकसान झाले आहे. नाचणे -नारायणमळी गावात जिल्हा परिषदेचा रस्ता खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. याबाबतची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बाजारपेठेतच घुसले पाणी; १२९ दुकानांना फटका
गुरुवारी रात्री खेड बाजारपेठेत पाणी घुसले, त्यामुळे तब्बल १२९ दुकानांना त्याचा फटका बसला. या दुकानांचे २ कोटी ८६ लाख १0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
बाजारपेठेत पाणी घुसल्याने एकाचवेळी एवढ्या दुकानांचे इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची गेल्या अनेक वर्षातील ही पहिलीच घटना आहे.त्यामुळे खेडमधे पावसाचा आजवरचा सर्वांंत मोठा फटका आहे.


 

Web Title: Crores of losses in villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.