नगरोत्थान महाअभियानातून कोट्यवधींची कामे
By admin | Published: October 6, 2016 10:11 PM2016-10-06T22:11:52+5:302016-10-07T00:21:58+5:30
चिपळूण पालिका : आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन करणार, राजेश कदम यांची माहिती
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेने गेल्या पाच वर्षात पालकमंत्री, जिल्हाधिकारी व माजी आमदार रमेश कदम यांच्या सहकार्यामुळे कोट्यवधींची विकासकामे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून मार्गी लावली आहेत. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली असून, काही कामांच्या कार्यारंभाचे आदेश देण्यात आले आहेत. या कामांचे आचारसंहितेपूर्वी भूमिपूजन होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे गटनेते राजेश कदम यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सन २०१०पासून २०१५पर्यंत जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेले प्रस्ताव मंजूर झाले. त्यासाठी आजी-माजी पालकमंत्र्यांनी नगर परिषदेला सहकार्य केले. त्यामुळे पाठविलेल्या सर्वच प्रस्तावांची कामे मार्गी लागली आहेत.
२०१०-११ या आर्थिक वर्षात ६२ लाख ३४ हजार ५८१ रुपये निधी मंजूर झाला होता. सन २०११-१२मध्ये ४५ लाख ८२ हजार ३३३ रुपये, २०१२-१३ मध्ये ३४ लाख ४० हजार ४४९ रुपये, २०१३-१४ मध्ये ३३ लाख ९१ हजार ३८९ रुपये, २०१४-१५ मध्ये १ कोटी ८२ लाख २० हजार ९५० रुपये मंजूर करण्यात आले. ही सर्व विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०१४-१५साठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आराखडा मागितला होता. त्यानुसार नगर परिषदेने २ कोटी ११ लाख ७६ हजार ७१७ रुपयांचा आराखडा पाठविला. त्यातील १ कोटी ८० लाख रुपये शासनाने नगर परिषदेला दिले. १४ डिसेंबर २०१५ रोजी याला मंजुरी मिळाली. निविदा प्रक्रिया होऊन यातील काही कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत तर उर्वरित कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. या कामांमध्ये रॉयलनगर रस्ता डब्ल्यूबीएम व डांबरीकरण करणे, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील भागामध्ये पार्किंगसाठी सिमेंट क्राँक्रिटीकरण करणे, गोविंदगड किल्ल्याकडे जाणारा नवीन रस्ता तयार करणे, बायपास रोड ते खेंड गणेश मंदिर रस्ता डांबरीकरण, खेंड गणेश मंदिर रस्त्याला आरसीसी गटार बांधणे, या रस्त्याला स्लॅब व मोरी बांधणे, आदी कामे मार्गी लागली आहेत. या कामांसाठी बांधकाम सभापती शिल्पा सप्रे व नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनीही चांगले सहकार्य केल्यामुळे जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्या सहकार्याने ही कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्यामुळेच चिपळूण शहरातील जनतेच्या विकासासाठी आम्ही चांगले काम करु शकलो, असे गटनेते कदम यांनी सांगितले. यावेळी बांधकाम सभापती शिल्पा सप्रे, आरोग्य सभापती आदिती देशपांडे, पाणीपुरवठा सभापती रुक्सार अलवी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)