चिपळूण बाजारपेठेतील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:32 AM2021-05-09T04:32:43+5:302021-05-09T04:32:43+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : येथील बाजारपेठेत वाढलेली गर्दी लक्षात घेत पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील चिंच नाका येथे शनिवारी बॅरिकेट्स ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : येथील बाजारपेठेत वाढलेली गर्दी लक्षात घेत पोलिसांनी मुख्य रस्त्यावरील चिंच नाका येथे शनिवारी बॅरिकेट्स उभारून मार्ग सील केला. त्यामुळे खासगी वाहतुकीवर नियंत्रण आले असतानाच अनेक दिवसांनी बाजारपेठेतील गर्दी ओसरण्यास मदत झाली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. तरीही येथील बाजारपेठेत सकाळी ७ ते ११ च्या दरम्यान खरेदीसाठी मोठी गर्दी होत होती. गर्दी कमी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी काही उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यानुसार येथील पोलिसांनी शनिवारपासून बाजारपेठेत ठिकठिकाणी बॅरिकट्स उभारले. सकाळी ११ नंतर बाजारपेठेतील मेडिकल, वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करीत होते. त्यामुळे दुपारनंतर बाजारपेठेतील सर्वच दुकाने बंद होती. तसेच दुचाकी व खासगी वाहनधारकांची गर्दी कमी झाली होती.
गेले काही दिवस बाजारपेठेत सकाळी भाजीपाला तसेच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची मोठी गर्दी होत होती. मात्र, आता जुने बसस्थानक व पानगल्ली या दोन्ही ठिकाणी तहसीलदारांनी मनाई आदेश लागू करीत तेथील भाग सील केला आहे. यामुळे गर्दी नियंत्रणात येण्यास मदत झाली आहे. दरम्यान, रत्नागिरी आणि चिपळूण येथे जिल्हाधिकारी यांनी हेल्मेट सक्ती केली आहे. शनिवारी त्याचे चांगले पडसाद उमटले. दुचाकीस्वार घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडत होते. हेल्मेट सक्ती लागू झाली असली तरी शनिवारी पहिल्या दिवशी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना समज देऊन सोडण्यात आले. सक्ती झाल्याने शनिवारी हेल्मेट खरेदीसाठी काहींची पळापळ झाली.