Waterfalls in Konkan: चित्ताकर्षक सवतसडा; ‘सवतसडा’ नावाची 'अशी' आहे कहाणी.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 12:22 PM2024-07-22T12:22:44+5:302024-07-22T12:25:43+5:30

या ठिकाणाला 'असे' पडले ‘सवतसडा’ नाव

Crowd of tourists at Savatsada Falls which is only about 4 km from Chiplun | Waterfalls in Konkan: चित्ताकर्षक सवतसडा; ‘सवतसडा’ नावाची 'अशी' आहे कहाणी.. वाचा सविस्तर

Waterfalls in Konkan: चित्ताकर्षक सवतसडा; ‘सवतसडा’ नावाची 'अशी' आहे कहाणी.. वाचा सविस्तर

संदीप बांद्रे, चिपळूण

पावसाळी हंगामात परशुराम घाट रस्त्याच्या अंतर्गत घळईत घाट चढताना उजवीकडे कोसळणाऱ्या जलप्रपातास म्हणजेच सवतसडा धबधबा. विशेषतः रौद्ररूप धारण करून पावसाळ्यात कोसळणाऱ्या या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे दर्शन चित्ताकर्षक ठरते. पावसाळ्यात धबधब्याचा परिसर हिरवाईने नटलेला असतो.

चिपळूणपासून सुमारे अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. या धबधब्याच्या माथ्याकडील भाग बाह्यवक्र (ओव्हर हँग) प्रकारचा आहे. त्यामुळे धबधब्याच्या वेगवान जलधारा डोंगर कड्यापासून काही अंतरावर कोसळतात. उंचीवरून कोसळणाऱ्या जलधारांच्या प्रभावामुळे त्याच्या पायथ्याशी डोहासारखा खड्डा तयार झाला आहे. पावसाळ्यात येथे पर्यटकांची खूप गर्दी होते.

मुंबईकडून चिपळूणला येताना महामार्गाच्या डाव्या बाजूला हा धबधबा उंचावरून कोसळताना दिसतो. सवतसड्याच्या धबधब्याखाली भिजण्याची मजा लुटण्यासाठी शनिवार-रविवार येथे पर्यटकांची गर्दी असते. जुलै ते ऑक्टोबर या काळात धबधब्याला भरपूर पाणी असते. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह खूप जोरात वाहत  असतो. येथे पर्यटकांसाठी धबधब्यापर्यंत जाण्याकरिता पाऊलवाट असून, विश्रांतीसाठी शेडची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथे कायम गर्दी होते. गेल्या काही दिवसांपासून येथे गर्दीचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये केवळ स्थानिक नसून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासीही हजेरी लावतात.

तेव्हापासून बनला ‘सवतसडा’

या परिसरातील निवासिनी नावडती स्त्री व आवडती स्त्री या दोघींचे एकमेकांशी सवतीचे नाते होते. एकदा आवडती स्त्री नावडत्या स्त्रीला म्हणाली, तुझी मी आज वेणी-फणी करते. अचानकपणे उफाळून आलेल्या या प्रेम भावनेविषयी नावडतीला आवडतीची शंका आली. प्रत्यक्ष वेणी-फणी घालण्यासाठी त्या कड्यावर बसल्या. त्यावेळी नावडतीने स्वतःच्या पदराची गाठ आवडतीच्या पदराला बांधली. वेणीफणी आटोपल्यावर आवडतीने नावडतीला धक्का देऊन कड्यावरून ढकलले. परंतु, बांधलेल्या गाठीमुळे नावडतीसह आवडतीही कड्यावरून खाली कोसळली गेली. तेव्हापासून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणाला ‘सवतसडा’ असे नाव पडले.

Web Title: Crowd of tourists at Savatsada Falls which is only about 4 km from Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.