दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी, दिवाळीची सुट्टी व्यावसायिकांच्या पथ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 12:45 PM2024-11-08T12:45:32+5:302024-11-08T12:46:17+5:30

दापोली : दिवाळीची सुट्टी पडताच पर्यटकांची पावले दापाेलीकडे वळू लागली आहेत. मात्र, सध्या ‘वन डे टूर’ साठी येणाऱ्या पर्यटकांची ...

Crowd of tourists on the Dapoli coast, Diwali holiday on the path of professionals | दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी, दिवाळीची सुट्टी व्यावसायिकांच्या पथ्यावर

दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी, दिवाळीची सुट्टी व्यावसायिकांच्या पथ्यावर

दापोली : दिवाळीची सुट्टी पडताच पर्यटकांची पावले दापाेलीकडे वळू लागली आहेत. मात्र, सध्या ‘वन डे टूर’ साठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. गेल्या पाच दिवसांत दापोलीच्या किनारपट्टीवर दि. २ तारखेपासून सुमारे ३ लाख पर्यटकांनी हजेरी लावली आहे. अजूनही पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

पर्यटकांनी तीन-चार महिने आधीच नियोजन करून कोकणात दिवाळी साजरी करण्याचे पक्के केले होते. त्यानुसार आधीपासूनच बुकिंग सुरू केले हाेते. त्यामुळे दिवाळीची सुट्टी पडताच पर्यटकांची पावले दापाेलीकडे वळली आहेत.

कोकणातील संगीत कार्यक्रम, डॉल्फिन सफारी, वॉटर स्पोर्ट्स यांचे आयोजन पर्यटन व्यावसायिक करतात. समुद्रातील सफर, किनाऱ्यांवरील विविध खेळ, डॉल्फिन दाखविण्याची व्यवस्था यासाठी बोटींची व्यवस्था करण्यापासून पर्यटकांचे विविध प्रकारे मनोरंजन करण्यासाठी येथील पर्यटन व्यावसायिक सज्ज आहेत. गेल्या पाच दिवसांत दापाेलीत सुमारे तीन लाख पर्यटकांनी हजेरी लावल्याचे सांगण्यात येत आहे.

तपासणीमुळे पर्यटक हैराण

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पर्यटकांना पोलिसांच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे. पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येताना किमान नऊ ते दहा ठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. त्याठिकाणी सर्व साहित्याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे रनिंग पर्यटकांचे प्रमाण कमी झाले आहे. मार्च व एप्रिलमध्येही लोकसभा निवडणुकीमुळे पर्यटनावर परिणाम झाला हाेता.

दिवाळी सुट्टीचा हंगाम हा खरा तर किमान १५ दिवस तरी चालतो. या कालावधीत माेठ्या प्रमाणात पर्यटक आले होते. परंतु, हे फक्त अजून चार दिवस चालेल. निवडणुकीमुळे इथे येईपर्यंत किमान नऊ ते दहावेळा पोलिसांकडून तपासणी हाेते, त्याला पर्यटक कंटाळत आहेत. - प्रबोध जोशी, व्यावसायिक, मुरुड
 

दि. २ नोव्हेंबरपासून पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. सध्या कुटुंबासमवेत येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण जास्त आहे. येत्या दि. २० तारखेनंतर डिसेंबर महिन्याचे बुकिंग सुरू होईल. - नीलेश मुकादम, व्यावसायिक, मुरुड

Web Title: Crowd of tourists on the Dapoli coast, Diwali holiday on the path of professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.