चिपळूण आगारात परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:39 AM2021-09-16T04:39:47+5:302021-09-16T04:39:47+5:30
चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही ...
चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. दोन दिवसांत तब्बल १२६ एसटी बस रवाना झाल्या असून, जादा गाड्याही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
यावर्षी पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे बहुतांशी चाकरमान्यांनी चिपळूणकडे पाठ फिरवली. तरीही सुमारे २० हजारहून अधिक चाकरमानी येथे दाखल झाले होते. या चाकरमान्यांसाठी १६० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता परतीच्या प्रवासासाठीही तितक्याच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर बहुसंख्येने दाखल झालेले चाकरमानी परतीचा प्रवासासाठी मुंबई, पुण्याला निघाल्याने त्यांच्या प्रवासासाठी चिपळूण आगाराने विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या परतीच्या प्रवासासाठी आगाराने ३४ एसटी बसगाड्या मुंबई मार्गावर रवाना झाल्या आहेत. बुधवारी प्रवाशांची संख्या वाढल्याने यावेळी बसस्थानक पूर्णतः हाऊसफुल्ल झाले होते.
येथील आगारात सकाळपासूनच चाकरमान्यांची गर्दी झाल्याने मुंबईसह पुणे मार्गावरील बसगाड्या हाऊसफुल्ल होऊन जात होत्या. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारात स्वतंत्र जादा वाहतूक केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आगाऊ बुकिंग करण्यासाठी आरक्षण केंद्रासमोर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकीकडे चाकरमान्यांसाठी जादा बसगाड्याचे नियोजन आगार प्रशासनाकडून करण्यात आले असले, तरी दुसरीकडे मात्र स्थानिक ग्रामीण फेऱ्याचे वेळापत्रक कोलडमडले होते. मंगळवारी आगारातून चाकरमान्यांसाठी ३४ तर बुधबारी ९२ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीचालक वाहकांना आगार प्रशासनाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.