लसीकरणासाठी सर्वच केंद्रांवर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:17+5:302021-04-22T04:32:17+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे लसीचा ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी सध्या जिल्ह्यासाठी येणारा साठा अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा होताच नागरिकांची लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. सध्या सहव्याधी असलेल्यांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी होऊ लागली आहे.
व्यापाऱ्यांना दिलासा
लांजा : राज्य शासनाने अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पूर्णपणे बंद असलेला व्यवसाय काही अंशी का होईना सुरू झाला आहे. त्यामुळे किराणा, भाजीविक्रेते आदी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यापाऱ्यांना हायसे वाटले.
निर्जंतुकीकरणाची माेहीम सुरू
देवरूख : कोरोना बाधितांची संख्या नव्याने वाढू लागल्याने देवरूख नगर पंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात औषध फवारणी तसेच निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडण्याऐवजी घरपोच सेवेवर भर द्यावा, यासाठी सातत्याने आवाहन करण्यात आले आहे.
विनाकारण फिरणाऱ्यांना दट्टा
खेड : शहर तसेच परिसरात लाॅकडाऊन काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचा चांगलाच वचक आहे. अशा व्यक्तींची सक्तीने ॲंटिजेन चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक व्यक्तींची चाचणी मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे आता विनाकारण फिरणाऱ्यांना चांगलाच दट्ट्या बसला आहे.
उरूस कार्यक्रम रद्द
देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा शास्त्री पूल येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत जंगल पीर शहा बाबांचा उरूस रद्द करण्यात आला आहे. हा उरूस १५ मे रोजी होणार होता. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी हा उरूस रद्द करण्यात आला आहे.
मोकाट जनावरांचा त्रास
गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे कोंडवाडी परिसरात सध्या मोकाट जनावरांची समस्या वाढू लागली आहे. ही जनावरे बागांचे तसेच फळभाज्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहेत. त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदेाबस्त करावा, तसेच त्यांच्या मालकावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
लसीकरणाला प्रतिसाद
आवाशी : खेड तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येत आहेत. शासनाच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम वैद्यकीय अधिकारी डाॅ. नितीन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
अभ्यागतांचा मुक्त प्रवेश
रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने या कार्यालयांमध्ये सतत अभ्यागतांची वर्दळ सुरू असते. मात्र, सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बाहेरच्यांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही या कार्यालयांमध्ये लोकप्रतिनिधी बैठकांसाठी मुक्तपणे वावरत आहेत.
एस. टी. फेऱ्या सुरू
राजापूर : तालुक्यातील जैतापूर येथील एस. टी. आगारातून शनिवारपासून राजापूर - जैतापूर - बोरिवली आणि राजापूर - बोरिवली या दोन फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीसाठ्यात घट
चिपळूण : उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होत आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यांतील पाणी पातळीत किरकोळ घट झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे आता पाणी पातळीत घट होत आहे.