वित्त विभागात ठेकेदारांची वर्दळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:32 AM2021-03-31T04:32:20+5:302021-03-31T04:32:20+5:30
रत्नागिरी : आर्थिक वर्षअखेरमुळे जिल्हा परिषदेतील वित्त विभागात मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या ...
रत्नागिरी : आर्थिक वर्षअखेरमुळे जिल्हा परिषदेतील वित्त विभागात मोठ्या प्रमाणात रेलचेल सुरू आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या चेंबर्सच्या बाहेर ठेकेदारांनी दिवसभर गर्दी केली होती. काही ठेकेदार तर केबीनबाहेरच पैसे मोजतानाचे चित्र दिसत होते. त्यामुळे वेगळीच चर्चा परिषद भवनात सुरू होती.
शासकीय कार्यालयांमधील कामकाज ऑनलाइन सुरू असले, तरी काही अर्थपूर्ण देवाण-घेवाण सुरूच असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. ऑनलाइन कामकाज सुरू असले, तरी विकास कामांवर खर्च करण्यात येणारा निधी वर्ष अखेरीस बहुतांश कार्यालयाकडून खर्ची घातला जातो. शासनाकडून निधी उशिरा येत असल्याने, हा निधी खर्च टाकण्याचा सोपस्कार केला जातो. त्यासाठी वर्षभर उंबरठे झिजविणाऱ्या ठेकेदारांना मार्च अखेरीसच विकास कामांवर केलेल्या खर्चाची रक्कम मिळते.
जिल्हा परिषदेत सध्या मार्च एंडिंगची वर्दळ प्रत्येक विभागात सुरू असली, तरी या कालावधीतील केंद्रबिंदू वित्त विभाग आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्षभर सुरू असलेल्या विकास कामांचा निधी वित्त विभागातूनच खर्ची टाकण्यात येताे. त्यामुळे शेवटी मंजूर झालेले बिलावर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय ठेकेदाराला बिल अदा केले जात नाही. आता आर्थिक वर्षअखेर असल्याने, मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर ठेकेदारांची गर्दी दिसून येत हाेती. अभ्यागतांना भेटण्यासाठी वेळ न देता, ठेकेदारांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे चित्र मुख्य व वित्त अधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर दिसून येत होते.