कोरोना लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:39+5:302021-04-22T04:32:39+5:30
रत्नागिरी : चार दिवसांनंतर लस उपलब्ध झाल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी उसळली होती. लस मिळविण्यासाठी लोकांची धडपड ...
रत्नागिरी : चार दिवसांनंतर लस उपलब्ध झाल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी उसळली होती. लस मिळविण्यासाठी लोकांची धडपड सुरू होती.
शासनाकडून लसीचा कमी पुरवठा होत असल्याने लस लवकर संपते. त्यासाठी शहरातील विविध लसीकरण केंद्रांवर नागरिक गर्दी करीत आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीमध्ये लोक सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत नसल्याने अनेकदा वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. हे लसीकरण केंद्र पूर्वी अपघात विभागाच्या येथे होते. आता ते नेत्र विभागाजवळ हलवण्यात आले आहे. मात्र, तेथे मोठी गर्दी होत आहे. या ठिकाणी रेल्वे, एस. टी.चे कर्मचारी माेठ्या संख्येने येत आहेत. प्रत्येकजण आपल्या लोकांच्या लसीकरणाची मागणी करीत आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवरही ताण पडत आहे. या ठिकाणी टोकन देण्याची पद्धतही सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या ठिकाणी गर्दी होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. आता हे केंद्र आज, गुरुवारपासून मिस्त्री हायस्कूलमध्ये स्थलांतरित होत आहे. शासकीय रुग्णालय हे कोविड सेंटर झाल्यामुळे तेथील लसीकरण केंद्र हलविण्यात आले आहे.
शहरातील झाडगाव आणि कोकणनगर येथील केंद्रांवरही मोठी गर्दी होऊ लागली आहे. लसीचा साठा अधूनमधून गायब होत असल्याने ही गर्दी वाढतच आहे.