Ratnagiri News: हातीस येथे पीर बाबरशेख उरूसासाठी गर्दी, पोलिस दलाच्या श्वानातर्फे सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 02:17 PM2023-02-06T14:17:13+5:302023-02-06T14:17:49+5:30
दर्ग्याच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट
रत्नागिरी : भाविकांचे श्रद्धास्थान आणि हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हातीस (ता. रत्नागिरी) येथील पीर बाबरशेख यांचा उरूस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. उरूसासाठी भाविकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. दर्ग्याच्या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली हाेती.
हातीस येथील उरूसासाठी जय्यत तयारी करण्यात आली हाेती. रविवारी सुट्टी असल्याने शनिवारपासूनच भाविक तंबू ठोकून निवासासाठी आले होते. रविवारी दुपारी इब्राहिमपट्टण येथील सय्यद व मानकरी मुस्लीम बांधवांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कबरीवर चुन्याचा लेप देण्यात आला. रात्री मानकरी नागवेकर यांच्या घरातून संदल, गिलाफ (चादर) मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्री शस्त्रांचा खेळ सादर करण्यात आला.
रविवारी दुपारी चुना लेपनावेळी काही तास दर्शन बंद ठेवण्यात आले होते. प्रार्थनेनंतर सायंकाळी दर्शन खुले करण्यात आले. सोमवारी रात्री दर्ग्यात नियाज (महाप्रसाद) होणार आहे.
उरूसानिमित्त रत्नागिरी बसस्थानकातून जादा गाड्यांची सुविधा केली हाेती. यात्रेनिमित्त तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. हातीस येथेही छोटे वाहनतळ उभारले आहे. जिल्हा टू व्हिलर्स मेकॅनिकल असोसिएशनतर्फे माेफत वाहन दुरुस्तीची व्यवस्था केली आहे.
श्वानाची सलामी
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हातीस येथील पीर बाबरशेख येथील उरुसाला उत्साहात सुरूवात झाली. जिल्हा पाेलिस दलाच्या श्वानातर्फे रविवारी सलामी देण्यात आली. तसेच यात्रेदरम्यान काेणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी हातीस मार्गावर व दर्ग्यात, यात्रास्थळी पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.