लाॅकडाऊनच्या भीतीमुळे किराणा खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:54+5:302021-04-14T04:28:54+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाकडून लाॅकडाऊन घोषित करण्याचा इशारा ...
रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी शासनाकडून लाॅकडाऊन घोषित करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात लाॅकडाऊन होण्याची शक्यता असल्याने ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही किराणा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करीत आहेत.
लाॅकडाऊन घोषित करताना जीवनावश्यक वस्तू, किराणा माल उपलब्धतेबाबत शासनाकडून सूचना देण्यात येणार आहेत. मात्र कडकडीत बंदची भीती जनतेत असल्यानेच ग्राहक किराणा माल खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील धनजीनाका परिसर बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सामान भरलेल्या पिशव्या वाहून नेण्याची कसरत ग्राहकांनाच करावी लागत आहे. दि. ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन होण्याची चर्चा होत असल्याने साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानांतून एकच गर्दी होती.