ऑनलाईन लसीकरणाच्या नोंदणीमुळे कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:32 AM2021-05-08T04:32:51+5:302021-05-08T04:32:51+5:30
आरवली : लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीमुळे शुक्रवारी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. यात स्थानिकांपेक्षा जिल्हाभरातून आलेल्या ...
आरवली : लसीकरणाच्या ऑनलाईन नोंदणीमुळे शुक्रवारी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. यात स्थानिकांपेक्षा जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांची संख्याच अधिक हाेती. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडत आहे.
कोरोना लसीकरणासाठी शासनस्तरावरून संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे़. मात्र ही नोंदणी जिल्हाभरातून कोणीही व्यक्ती करू शकत असल्याने गुरुवारी हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर काही कालावधीतच फुल्ल झाले. यात खेड, रत्नागिरी, चिपळूण आदी भागातील नागरिकांनी आपली नोंदणी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रावर केली. त्यामुळे शुक्रवारी कडवई प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्दी हाेती.
या गर्दीमुळे इथे नियमित उपचाराला येणाऱ्या रुग्णांनाही उपचारासाठी ताटकळावे लागले. वैद्यकीय अधिकारी संतोष यादव यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही यादव यांनी सांगितले़. कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे यांनी ही बाब आमदार शेखर निकम यांच्या कानावर घातली असता, ही ऑनलाईन नोंदणी पद्धत रद्द करून, त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकांचे लसीकरण ऑफलाईन पद्धतीने करण्यात यावे, असा प्रस्ताव शासन स्तरावर दिल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच हे लसीकरण सुरळीत होईल, अशी माहिती आमदार निकम यांनी दिली. त्यामुळे लसीकरणाचा हा सावळागोंधळ लवकर संपेल व सर्वसामान्यांना लसीकरणाचा लाभ मिळेल, अशी रास्त अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.