गुढीपाडवा खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:14+5:302021-04-13T04:30:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त समजला जातो. हिंदू नववर्षास प्रारंभ होत असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याचा मुहूर्त समजला जातो. हिंदू नववर्षास प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली होती. शहरातील धनजीनाका परिसरातील किराणा मालाची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद होती. अन्य भागातील दुकाने मात्र सुरू होती. राम आळीतील बहुतांश दुकाने बंद होती. राम आळी, धनजीनाका परिसरातील वाहतूक बंद असल्याने ग्राहकांना वळसा घेऊन जावे लागत होते. ग्राहकांना अक्षरश: पायपीट करावी लागत होती.
पाडवा मंगळवारी असून बुधवारीही शासकीय सुटी जोडून आल्यामुळे बँकांमध्येही आर्थिक देवाण-घेवाणीसाठी रांगा लागल्या होत्या. बँकांमध्येही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत असल्यामुळे एकावेळी पाच ग्राहकांना आत सोडण्यात येत होते.
बहुतांश गावांतून गुढीपाडव्यापर्यंत शिमगोत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे गावोगावी ग्रामदेवतांच्या पालख्यांचा उत्सव अद्याप सुरू आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर सोने - चांदीचे अलंकार, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, तयार घरे, जमिनींची खरेदी केली जाते. किंबहुना आधी खरेदी केलेल्या वस्तू पाडव्यादिवशी घरी आणल्या जातात. सोशल डिस्टन्सिंग ठेवून व्यवहार सुरू होते.
फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर भेटवस्तूच्या सुविधा विक्रेत्यांकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. दुचाकी, चारचाकी वाहने, गृहसंकुल प्रकल्प व्यावसायिकांनीही आकर्षक भेट योजना जाहीर केल्या आहेत. ‘सेकंड होम’साठी गुंतवणूक शासकीय कर्मचारी वर्गातून सुरू असली तरी, त्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय लोकेशन व दर्जा पाहून खरेदीस प्राधान्य देण्यात येत आहे.
गुढी उभारण्यासाठी लागणारे बांबू, कडुनिंबाचा पाला, झेंडूची फुले, बत्ताशांची माळ, वस्त्राची खरेदी बाजारात सुरू होती. शिवाय तयार गुढी देखील विक्रीस उपलब्ध आहे. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्यांना उंच गुढी उभी करणे अशक्य असल्यामुळे रेडिमेड/तयार गुढींना मागणी होत आहे.
मासेमारी बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. आंबा व्यवसाय सातत्याने गेली काही वर्षे संकटात आला आहे. रिअल इस्टेट गुुंतवणुकीस याची झळ बसत आहे. शहरात लोकेशन पाहून खरेदी करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.