गर्दीच्या ठिकाणी तपासणी होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:50 AM2021-05-05T04:50:34+5:302021-05-05T04:50:34+5:30
असे असताना, दुसऱ्या बाजूला मात्र बेफिकीरी दाखविणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे आपल्याला काही झालेले नाही अशा थाटात वावरणाऱ्या ...
असे असताना, दुसऱ्या बाजूला मात्र बेफिकीरी दाखविणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे आपल्याला काही झालेले नाही अशा थाटात वावरणाऱ्या आणि ज्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसत नाहीत अशांकडून संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, अशांवर सध्या कोणतेच बंधन नसल्याचे दिसून येत आहे. अनेक गावांमध्ये गृहअलगीकरणात असलेल्यांच्या हातावर पूर्वीसारखा शिक्का अद्याप मारलेला नव्हता, तसेच अशांच्या घरावरही गृहअलगीकरणासंदर्भात कुठलीच सूचना नसल्याने अनेक ग्राम कृती दलांनाही अशा व्यक्तींबाबत काहीच माहिती नाही. त्यामुळे अशा पाॅझिटिव्ह व्यक्ती गावांमध्ये, वाडींमध्ये राजरोस फिरत राहिल्याने अनेक गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. कोरोना गावांमध्ये वाढण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.
दुसरं महत्त्वाचे कारण म्हणजे बाहेरून येणाऱ्यांना एस. टी. प्रवासासाठी ई-पास आहे. मात्र, कोकण रेल्वेसाठी ई- पासची अट नाही, तसेच पूर्वी जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानके, बसस्थानके याठिकाणी थर्मल गन, ऑक्सिमीटर आदींमार्फत येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येईल, असे जाहीर केले होते. मात्र, त्याप्रमाणे काहीच झाले नाही. कोकण रेल्वेस्थानकावर बाहेरून येणाऱ्यांनी कोरोना चाचणीबाबत अहवाल आणला तरीही त्याची गरज नसल्याचे सांगून आता केवळ त्यांच्या हातावर होम विलगीकरणाचा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे या प्रवाशांमधून अनेक पाॅझिटिव्ह व्यक्ती जिल्ह्यात आल्या असून, त्यांनी आतापर्यंत त्यांच्या घरातील अनेक व्यक्तींना बाधित केले आणि त्यांच्या घरातल्यांकडून बाहेरच्यांनाही मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
गेल्या वर्षभरात जेवढी झाली नाही त्यापेक्षाही जास्त रुग्णसंख्या केवळ एप्रिल महिन्यात वाढली आहे. या महिन्यात तब्बल साडेअकरा हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यामागची ही कारणे जिल्हा प्रशासनाने लक्षात घ्यायला हवीत. आज आरोग्य यंत्रणेवर रुग्ण वाचविण्यासाठी प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करायचा असेल तर जिथे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे, तिथे काटेकोरपणे तपासणी होणे गरजेचे होते. मात्र, ती न झाल्याने जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडणे अशक्य झाले आहे. सध्या चाचण्या केल्या जाताहेत, त्यातूनच कोरोनाबाधितांची संख्या पुढे येत आहे. मात्र, जे अद्याप चाचण्या न करताच घरात आहेत त्यांच्याकडून कोरोनाचा होणारा फैलाव राेखणे अशक्य झाले आहे. त्यामुळे सध्या ही संख्या आटोक्यात आणताना जिल्हा प्रशासन मेटाकुटीस आले आहे.
सध्या भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करून त्यांना सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, तिथेही होणारी गर्दी न टाळता येण्यासारखी आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी तपासणी करायला हवी. अन्यथा आरोग्य यंत्रणेचे रुग्णांना वाचविण्यासाठीचे प्रयत्न फोल ठरतील.