गणपतीपुळ्यात मुंबई, पुण्याचीच गर्दी; अन्य भागातील पर्यटकांची प्रतीक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 11:49 AM2024-05-10T11:49:56+5:302024-05-10T11:50:17+5:30
निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल असा अंदाज
रत्नागिरी : प्रचंड उष्मा आणि त्यात लाेकसभा निवडणुकीची धामधूम यामुळे सुटीचा हंगाम सुरू हाेऊन अजूनही रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे क्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या घटली आहे. सध्या गणपतीपुळे येथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई, पुण्यातील पर्यटकांची संख्या अधिक आहे. दिवसभरात आठ ते दहा हजार लोक ‘श्रीं’चे दर्शन घेत आहेत.
दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटकांची रेलचेल सुरू हाेते. गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातून येतात. दरवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला हा पंधरा ते वीस हजार पर्यटक गणपतीपुळे येथे हजेरी लावतात. मात्र, यावर्षी यामध्ये घट झाली आहे. वाढते तापमान आणि त्यातच लाेकसभा निवडणूक यामुळे पर्यटकांची संख्या राेडावल्याचे सांगण्यात येत आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात तिसऱ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक आलेले नाहीत. काेकणात निवडणुकीसाठी आलेल्या मुंबई, पुण्यातील नागरिकांनी गणपतीपुळेला भेट दिली. मुंबई व पुण्यात चाैथ्या टप्प्यात १३ मे राेजी मतदान हाेणार असल्याने ही मंडळी पुन्हा रवाना झाली आहे.
उन्हाच्या कडाक्यामुळे बहुसंख्य पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाहेर पडत आहेत. रात्री प्रवास करून दिवसा विश्रांती घेण्यावर अनेकांचा भर आहे. समुद्रकिनारीही उन्हाचा कडाका असल्याने पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल, असा अंदाज आहे.
पर्यटकांची संख्या कमीच
मे महिन्याच्या सुटीमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर गणपतीपुळेतील व्यावसायिकांची उलाढाल होत असते. मात्र, सध्या उकाडा प्रचंड असल्याने पर्यटक येण्यास उत्सुक नाहीत. त्यामुळे अजूनही पर्यटकांची संख्या कमी आहे. निवडणुकांचा कालावधी संपला की, पर्यटक वाढतील, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.