रत्नागिरीतील जयगडमध्ये थांबणार ‘क्रुझ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:24 PM2018-10-03T13:24:38+5:302018-10-03T13:35:00+5:30
बहुचर्चित मुंबई-गोवा क्रुझ सेवेला प्रारंभ होत आहे. मुंबई ते गोवा मार्गात ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही ‘क्रूझ’ गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
रत्नागिरी : बहुचर्चित मुंबई-गोवा क्रुझ सेवेला प्रारंभ होत आहे. मुंबई ते गोवा मार्गात ही क्रूझ ६ ठिकाणी थांबा घेणार आहे. दिघी, दाभोळ, रत्नागिरीतील जयगड, विजयदुर्ग, देवगड, पणजी असे थांबे घेत ही ‘क्रूझ’ गोव्यात दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.
जानेवारी २०१८पासूनच ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणींमुळे सेवेला मुहूर्त मिळाला नव्हता. ‘आंग्रिया’ असे या क्रूझचे नाव आहे. आंग्रिया सी इगल कंपनी आणि मुंबई पोर्ट यांनी ही क्रूझ सेवा सुरू केली आहे. या क्रूझवर जवळपास ८ रेस्टॉरंट, बार, कॉफी शॉप, स्विमिंग पूल, मिनी गोल्फ क्लब, क्लब्स असे बरेच काही अनुभवता येणार आहे. एका क्रूझमध्ये ३०० ते ४०० प्रवासी प्रवास करू शकतील. मुंबईत ही क्रूझ माझगावच्या भाऊचा धक्का इथून सुटणार आहे. ७००० रुपये आणि त्याहून अधिक या क्रूझचे तिकीट आहे. ३ आॅक्टोबरनंतर रोज संध्याकाळी ५ वाजता ही बोट भाऊच्या धक्का इथून निघेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता गोव्यात पोहोचेल.
कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून नाव
कान्होजी आंग्रे नावाचे मराठा सरदार शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख होते. त्यांच्या नावावरून महाराष्ट्र आणि गोव्याच्या दरम्यान प्रवाळांचे एक मोठे बेट आहे, त्याला आंग्रिया बेट असे नाव पडले. आणि त्या बेटावरून या क्रूझला ‘आंग्रिया’ हे नाव देण्यात आले आहे. ही क्रूझ जपानमधून मागवण्यात आली आहे.