शववाहिनीविना गुहागरात मृतदेह नेताना पराकाष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:57+5:302021-04-20T04:32:57+5:30
गुहागर : तालुक्यात कोविड रुग्णाच्या वाढत्या रुग्णांबरोबरच मृतांच्या प्रमाणातही वाढ हाेत आहे. अशा स्थितीत तालुक्यात मृत्यू झालेल्यांसाठी शववाहिनीच उपलब्ध ...
गुहागर : तालुक्यात कोविड रुग्णाच्या वाढत्या रुग्णांबरोबरच मृतांच्या प्रमाणातही वाढ हाेत आहे. अशा स्थितीत तालुक्यात मृत्यू झालेल्यांसाठी शववाहिनीच उपलब्ध नसल्याने, मृत रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी पराकाष्ठा करून न्यावे लागत आहे. नातेवाइकांचे हाेणारे हे हाल थांबविण्याची मागणी हाेत आहे.
मागील वर्षी तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या मर्यादित होती. यामध्ये मृत्यू हाेणाऱ्यांचे प्रमाणही कमी होते. मात्र, सध्या झपाट्याने रुग्णसंख्या वाढीबरोबरच मृत रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील आठवड्यात वेगवेगळ्या भागातील तीन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला होता. साखरीत्रिशूळ भागासाठी १५ तारखेपासून तिघांचा मृत्यू झाला आहे. गुहागर शहरातील ४५ वर्षीय तरुणाचा चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना रविवारी रात्री मृत्यू झाला, तसेच तालुक्यात आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढता ताण लक्षात घेऊन लसीकरण केंद्रात एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोळवली प्राथमिक केंद्रावर ३० वर्षीय शिक्षकांची नियुक्ती १९ एप्रिलपर्यंत होती. ५ ते १० एप्रिलपर्यंत काम केल्यानंतर लातूर येथील मूळ गावी वडिलांची तब्येत गंभीर असल्याने ते गेले हाेते. त्याच वेळी त्यांची तब्बेत गंभीर होऊन त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेचा धसका शिक्षकांनी घेतला आहे.
...............................
शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या मदतीला शिक्षकांना पाठविण्याचे हालचाली सुरू झाल्या आहेत. शिक्षकांमधून मात्र आरोग्य यंत्रणेबरोबर प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्याची मानसिकता नाही. शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत चर्चा सुरू झाल्या आहेत.