सांस्कृतिक कार्यक्रमांनी महसूलचे स्नेहसंमेलन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 10:03 PM2017-09-08T22:03:09+5:302017-09-08T22:06:35+5:30
रत्नागिरी : महसूल महिन्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सांगता
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महसूल महिन्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सांगता गुरूवारी रात्री येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात स्नेहसंमेलनाने झाली. केवळ दोन दिवसांच्या तयारीने हे स्नेहसंमेलन गाणे, फ्यूजन नृत्य, एकपात्री आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगले.
जिल्हाधिकारी कार्यालयाची महसूल शाखा या कार्यालयाचा कणा मानला जातो. मुळात महसूल विभागात मनुष्यबळ कमी असल्याने दैनंदिन कामकाजाबरोबरच इतरही कामाचा व्याप सांभाळावा लागतो. यावर्षी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल मास साजरा करण्याची संकल्पना जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी राबवण्याचे ठरविले. त्यानुसार अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेला महिनाभर या विभागातर्फे महिनाभर विविध उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आले. याअंतर्गत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यशाळा, अधिकारी - कर्मचारी तसेच त्यांच्या पाल्यांसाठी चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, तसेच रक्तदान शिबिर आदी उपक्रम घेण्यात आले. हे सर्व उपक्रम कार्यालयीन कामकाज सांभाळूनच पार पडले.
महसूल महिन्याची सांगता गुरूवारी रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे, रत्नागिरीचे प्रांत अमित शेडगे, चिपळूणच्या प्रांत कल्पना जगताप - भोसले, सहायक कामगार आयुक्त संदेश आयरे उपस्थित होते.
केवळ दोन दिवसांत तयारी करून या विभागातील कर्मचाºयांनी विविध उंच माझा झोका, मला वेड लागले, उगवली शुक्राची चांदणी, दिल दिया है जान भी देंगे आदी गाणी, तसेच नगाडा, लंडन ठुमकदा, उडी उडी जाय आदी नृत्य तसेच आ जा नचले यावर फ्यूजन नृत्य तसेच अतिशय उत्कृष्ट असे एकपात्री प्रयोग यावेळी सादर करण्यात आले. महसूल विभागाच्या तहसीलदार प्रियांका कांबळे - आयरे यांनी ‘गरज स्त्री संरक्षणाची की स्त्री मुक्तीची’ यावर मांडलेल्या विचारांनी उपस्थित महिलावर्गासोबतच पुरूष अधिकारी - कर्मचारी यांना अंतर्मुख केले. याच कार्यक्रमात मंगळागौर, फुगड्या आदी पारंपरिक कार्यक्रमांनी सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत अधिक वाढवली. मजीद माखजनकर आणि प्रकाश महाडेश्वर यांनी निवेदन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी प्रस्तावना केली. एरव्ही दैनंदिन कामात गर्क असणाºया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यातील कलाविष्कार यानिमित्ताने सादर झाले.
रक्तदान शिबिराचेदेखील आयोजन
महसूल मासानिमित्त महसूल विभाग आणि जिल्हा शासकीय रूग्णालयाची रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरीचे प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्यासह मनोज पवार, अमोल रायबोल, भाऊ पाटील, सुनील कीर, विश्वास झिटे, राघोजी नाईक, केतन जोशी, राहुल पिंगळे, जयानंद पठाडे, सुशील कोळंबेकर, रूपेश कांबळे आदी कर्मचाºयांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.