संचारबंदी कडक, अत्यावश्यक सेवाही आजपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:28 AM2021-04-17T11:28:09+5:302021-04-17T11:29:02+5:30
: ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी : ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरीत अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच औषध दुकानांमधील कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी करण्यास सुरुवात झाली आहे.
शासनाने १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळून अन्य दुकानांना सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार, शुक्रवारी अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेले किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, औषध दुकाने यांच्यासह बेकरी आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही दुकानेही तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाविषयक निर्देशानुसार घरपोच सेवेशी संबंधित कामगार वर्गाचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचेही आदेश दिले आहेत.
शुक्रवारी ही सर्व दुकाने सुरू होती. या दुकानदारांना एका दिवसात माल संपविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. औषधांची दुकाने वगळता अन्य दुकानांना बंदी घालण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा सर्वच दुकानदारांना घरपोच देता येणे शक्य नाही. त्यामुळे ही दुकाने बंद राहिली तर या दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्यामुळे किमान किराणा, दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली जात आहे.
घरपोचलाही अटी लागू
अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत केवळ घरपोच सेवा देता येणार आहे. अशा सेवा पुरविणारे दुकान मालक, तेथील कामगारांचे लवकारत लवकर लसीकरण करावे. पारदर्शक काच अथवा इतर सुरक्षा उपाय, ऑनलाइन पेंमेंट इत्यादीचे पालन करावे.
नियम मोडल्यास दंड
नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविड सुसंगत वागणुकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. शर्तभंगाची पुनरावृत्ती झाल्यास साथ संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कार्यवाही केली जाईल.
आता टपऱ्याही बंद
रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांना जागेवर खाद्यपदार्थ खाण्यास पुरविता येणार नाहीत. फक्त पार्सल सेवा व घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सर्व दिवशी सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वृत्तपत्र विक्री सुरू
सर्व ठिकाणचे पेपर स्टाल सकाळी १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा निर्णय घेतला आहे. तशी सूचना सर्व तालुक्यांना देण्यात आली आहे. रविवारपासून विक्रेत्यांना ॲन्टीजेन चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.