कर्नाटकमधील बनावट नाेटा रत्नागिरीच्या चलनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:22 AM2021-06-11T04:22:00+5:302021-06-11T04:22:00+5:30
- रत्नागिरीत साथीदार कार्यरत असण्याची शक्यता लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कर्नाटक कारवार येथे बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ...
- रत्नागिरीत साथीदार कार्यरत असण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कर्नाटक कारवार येथे बनावट नोटाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांनी सुमारे ९ लाख रूपयांच्या बनावट नोटा रत्नागिरीत अधिकृत चलनामध्ये खपविणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांचे अन्य साथीदार रत्नागिरीत कार्यरत आहेत का, याबाबत कर्नाटक पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
कर्नाटकातील कारवार येथील दांडेली ग्रामीण पोलिसांकडून बनावट नोटांचे रॅकेट चालवणारी टोळी ३ जून २०२१ रोजी जेरबंद केली होती. त्यांच्याकडून सुमारे ७२ लाख किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांकडून ६ जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये रत्नागिरीतील किरण मधुकर देसाई (४०, रा. मजगाव रोड, रत्नागिरी) व गिरीष पुजारी (४२, रा. जाकादेवी, रत्नागिरी) यांना बनावट नोटांसह ताब्यात घेण्यात आले होते. ९ लाख रूपयांच्या बनावट नोटा किरण देसाई व गिरीष पुजारी हे रत्नागिरीत आणणार होते. यासाठी किरण व गिरीष यांनी दांडेली येथे राहणारा शिवाजी कांबळे याला ४ लाख रूपये देऊन ९ लाख रूपयांच्या बनावट नोटांचा व्यवहार केला. हा व्यवहार सुरू असतानाच दांडेली पोलिसांनी छापा मारून कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळी सर्च ऑपरेशन केले असता, त्यांना एकूण ७२ लाख रुपयांच्या बनावट नोटा शिवाजी कांबळे याच्या घरी सापडल्या. किरण व गिरीष आपल्या ओळखीच्या माणसांच्या माध्यमातून कर्नाटक येथे गेले होते. किरण व गिरीष हे दोघेही रत्नागिरी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या या बनावट रॅकेटच्या प्लानमध्ये अजून कितीजण सहभागी आहेत का, याचा शाेध सुरू आहे.