पार्सल सेवेकडे ग्राहकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:30 AM2021-04-18T04:30:48+5:302021-04-18T04:30:48+5:30
लग्नाचे कार्यक्रम रद्द रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित लग्नसमारंभ रद्द ...
लग्नाचे कार्यक्रम रद्द
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सर्वत्र लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नियोजित लग्नसमारंभ रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे सभागृह, कॅटरिंग, साऊंड सिस्टिम, वाद्यवृंद आदी विविध व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला आहे. २५ लोकांची परवानगी असल्याने काही यजमानांनी सभागृह रद्द करून घरातच लग्नसोहळा उरकत आहेत.
परीक्षा ऑनलाइन
रत्नागिरी : कोरोनामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डिसेंबर २०२० च्या प्रलंबित विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे महिन्यात ऑनलाइन होणार आहेत. विद्यापीठाने संकेतस्थळावर वेळापत्रक जारी केले आहे. सकाळ, दुपारच्या प्रत्येकी पाच तासांच्या सत्रात विद्यार्थ्यांना ही एक तासाची परीक्षा द्यायची आहे.
नियंत्रण कक्ष कार्यान्वित
रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू केले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, निविष्ठांचा पुरवठा सुरळत व्हावा, यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी ते सकाळी ६ यावेळेत संपर्क साधण्यासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मार्गदर्शन कार्यशाळा
रत्नागिरी : माेहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘पशुसंवर्धन एक स्वयंरोजगाराचा उत्तम पर्याय’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पंचायत समितीचे विकास विस्तार अधिकारी डाॅ.अभिजित कसाळकर यांनी मार्गदर्शन केले.
बीएसएनएल सेवेचा बोजवारा
राजापूर : तालुक्यातील गोवळ येथील भारत संचार निगमचा मोबाइल टाॅवर गेले कित्येक दिवस बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. या संदर्भात तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पन्हळे, दादनवाडी, शिवणे, गोवळ, सोगमवाडी या वाड्या बीएसएनएलवर अवलंबून असल्याने त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
टँकरला मागणी
खेड : तालुक्यातील दुर्गम भागात ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तालुक्यातील चार गावे व सहा वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील पहिला टँकर खवटी - खालची धनगरवाडी येथे धावला होता. त्यानंतर वरची धनगरवाडी, आंबवली - भिंगारा, सवणस - मूळगाव या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू झाला.
सनियंत्रित समितीची सभा
राजापूर : जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची २०२१-२२ या वित्तीय वर्षाची पहिली सभा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरचित्रप्रणालीद्वारे झाली. या सभेत शासनाच्या विविध योजनांच्या आढावा घेण्यात आला. आमदार राजन साळवी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित होते.
पथदीप बंद
राजापूर : राजापुरातील साखरीनाटे गावातील पथदीप काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याने हे बंद पथदीप तत्काळ सुरू करावेत, अशी ग्रामीण ग्रामस्थांतून होत आहे.
कागदपत्रे तपासण्याची मागणी
रत्नागिरी : राज्यस्तरावरून आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन सोडत जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती किंवा प्रवेशाची तारीख बघावी. निर्धारित मुदतीतच पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रे तपासण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.