रत्नागिरीत निघाली पर्यावरण पूरक गणेशाेत्सवासाठी सायकल रॅली
By शोभना कांबळे | Published: September 3, 2023 01:13 PM2023-09-03T13:13:46+5:302023-09-03T13:15:49+5:30
सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाेभना कांबळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : ‘पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा, स्वच्छ, सुंदर व हरित रत्नागिरी’ हा संदेश घेऊन जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनातर्फे रविवारी (३ सप्टेंबर) रत्नागिरी शहरात सायकल रॅली काढून जनजागृती केली.
पोलिस कवायत मैदान येथे हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह आणि पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या सायकल रॅलीचा शुभांरभ केला. यावेळी परिविक्षाधीन आयएस अधिकारी डाॅ. जास्मिन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, विशेष भू संपादन अधिकारी निशा कांबळे, रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबचे दर्शन जाधव, महेश सावंत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिंह म्हणाले की, हरित रत्नागिरी, स्वच्छ रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी हे तीन उद्देश घेऊन आणि पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करावा. याबाबतची जनजागृती व्हावी यासाठी ३० किलाेमीटरची सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले. पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल चालविणे हा पर्यावरणपूरक असा उपक्रम असल्याने सायकल रॅलीच्या माध्यमातून जनतेला यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संदेश देऊ या, असे ते म्हणाले.
ही रॅली पोलिस कवायत मैदान येथून मारुती मंदिर-गोडावून स्टॉप-आरटीओ ऑफीस-कुवारबाव- रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकमार्गे परत कुवारबाव-मारुती मंदिर-जयस्तंभ-रामआळी-गाडीतळ-टिळक आळी-काँग्रेस भुवन- आठवडा बाजारमार्गे येऊन पोलिस कवायत मैदान येथे या रॅलीची सांगता झाली. सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.