चक्रीवादळामुळे राजापुरातील वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:33 AM2021-05-18T04:33:03+5:302021-05-18T04:33:03+5:30
राजापूर : ‘तौउते’ चक्रीवादळामुळे ओणी येथील सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या शनिवारपासून राजापूर शहरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागातील ...
राजापूर : ‘तौउते’ चक्रीवादळामुळे ओणी येथील सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गेल्या शनिवारपासून राजापूर शहरासह तालुक्याच्या बहुसंख्य भागातील वीज पुरवठा खंडित झाल्याने तो भाग अंधारात आहे़ सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला नव्हता़
ओणी येथील ३३ केव्ही सबस्टेशनमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे तालुक्याच्या पूर्व परिसरासह राजापूर शहर व त्यावर आधारित असलेला परिसर अंधारात बुडाला होता. त्यामुळे बहुसंख्य तालुकावासीयांना समस्यांचा सामना करावा लागला. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अनेक भागांतील मोबाइल सेवा खंडित झाली होती़ इंटरनेट सेवाही बंद पडल्याने नागरिकांना इतरत्र संपर्क साधणे कठीण बनले होते, तर मुंबईसह अन्य महानगरांत राहणाऱ्या नागरिकांना तालुक्याच्या विविध भागांत राहत असलेल्या आपल्या नातेवाइकांसह घरच्या मंडळींना वादळानंतर संपर्क साधता आला नाही. दोन दिवस तालुक्यातील बहुतांशी भागातील वीज पुरवठा पूर्ववत सुरू करण्यासंबंधित विद्युत वितरण विभागाला यश आले नव्हते.
रविवारी झालेल्या वादळानंतर तालुक्यात विविध ठिकाणी विजेचे खांब कोसळून वीज पुरवठा खंडित झाला होता, तर काही भागांत विद्युत वाहिन्यांवर झाडे पडून पुरवठा खंडित झाला होता. संबंधित वितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करीत होते. मात्र, संपर्क होत नसल्याने वादळामुळे विद्युत वितरणचे नेमके किती नुकसान झाले त्याची निश्चित आकडेवारी पुढे आली नव्हती. सोमवारी दुपारपर्यंत बहुतांशी तालुका अंधारातच होता.