चिपळुणातील पोलीसपाटलाची दबंगगिरी, शेतकऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:28 PM2020-10-12T14:28:30+5:302020-10-12T14:30:23+5:30
crimenews, chiplun, policepatil, ratnagirinews चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे - कुटलवाडी येथील एका शेतकऱ्याला गावच्या पोलीसपाटील प्रतिमा प्रभाकर गुजराथी व त्यांच्या दोन मुलांनी शेतात जनावरे गेल्याच्या रागातून मारहाण केली. यामध्ये हा शेतकरी जखमी झाला असून, त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे - कुटलवाडी येथील एका शेतकऱ्याला गावच्या पोलीसपाटील प्रतिमा प्रभाकर गुजराथी व त्यांच्या दोन मुलांनी शेतात जनावरे गेल्याच्या रागातून मारहाण केली. यामध्ये हा शेतकरी जखमी झाला असून, त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अंकुश लक्ष्मण निवाते (३५, मुर्तवडे - कुटलवाडी) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत निवाते यांनी फिर्याद दिली आहे. अंकुश निवाते हे पत्नी व मुलांसह ८ ऑक्टोबर रोजी घरी असताना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमाराला पोलीसपाटील प्रतिमा गुजराथी या घरी आल्या. तुझी जनावरे भातात गेलीत. चल माझ्याबरोबर तुला दाखवायला नेते, असे सांगून त्यांनी घराच्या बाहेर आणले. अंगणात त्यांची पत्नी, मुलगी अंकिता आणि पोलीसपाटील प्रतिभा गुजराथी उभ्या होत्या.
ह्यमाझी जनावरे तुमच्या भातशेतात गेली असतील तर तुमचे जे काही नुकसान झाले असेल, ते मी भरून देतो, असे अंकुश निवाते यांनी पोलीसपाटील यांना सांगितले. पण काहीही ऐकून न घेता मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी त्यांचे मुलगे प्रसाद आणि प्रवीण हे दोघे आले.
प्रसादने त्याच्याकडच्या बॅटने डोक्यात जोरात फटका मारला. त्याचवेळी प्रवीणने उजव्या पायावर त्याच्या हातातल्या काठीने फटका मारला. त्याचवेळी त्यांची पत्नी आणि मुलगी अंकिता सोडविण्यासाठी पुढे आल्या. तेव्हा प्रसादने दांडक्याने पत्नीच्या हाता -पायावर फटके मारले. दोघांनी अंकुश यांच्या पायावर मारल्याने त्यांना उठता येत नव्हते.
त्यानंतर पोलीसपाटील, प्रसाद आणि प्रवीण यांनी शिविगाळ केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी प्रसादने मारण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. अंकुश निवाते यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रतिभा गुजराथी यांनीही निवाते यांच्याविरुध्द तक्रार केली आहे.