लसीकरणाचा ‘डाेस’ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ‘भिनला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:29 AM2021-05-01T04:29:28+5:302021-05-01T04:29:28+5:30

रत्नागिरी : शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका मंगल कार्यालयात घेतलेल्या लसीकरण शिबिरावरून भाजपच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तू - तू, मैं - मैं’ ...

'Daes' of vaccination 'different' among BJP office bearers | लसीकरणाचा ‘डाेस’ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ‘भिनला’

लसीकरणाचा ‘डाेस’ भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये ‘भिनला’

Next

रत्नागिरी : शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एका मंगल कार्यालयात घेतलेल्या लसीकरण शिबिरावरून भाजपच्याच पदाधिकाऱ्यांमध्ये ‘तू - तू, मैं - मैं’ हाेऊ लागली आहे. एका गटाने हातमिळवणी करताच दुसऱ्या गटाने आक्रमक हाेत कारवाईचा हेका धरला आहे. त्यामुळे आता भाजपमध्येच लसीकरणावरून दाेन गट झाले असून, शिवसेनेने राबवलेल्या लसीकरण शिबिराचा ‘डाेस’ आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्येच ‘भिनला’ असल्याची जाेरदार चर्चा सुरू आहे.

लसीकरणाचा तुटवडा जाणवत असतानाच शिवसेनेच्या शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी शहरातीलच एका मंगल कार्यालयात लसीकरण शिबिराचे आयाेजन केले हाेते. या शिबिराचे फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल हाेताच भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्यावर आक्षेप घेतला. हे शिबिर शासकीय की अशासकीय आहे, असा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर युवा माेर्चाच्या अध्यक्षांनीही पुन्हा तीच ‘री’ ओढत कारवाईची मागणी रेटून धरली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा आराेग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांना नाेटीस काढली.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी रेटा लावलेला असतानाच शिवसेनेच्या एका ‘वजनदार’ पदाधिकाऱ्याने भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांशी बंद खाेलीत चर्चा केली. या चर्चेमध्ये नेमकी काय बाेलणी झाली, यावर बाेलण्यास साऱ्यांनीच नकार दिला. मात्र, त्यानंतर विराेधाचा सूर मावळल्याचे दिसून आले. हा विराेध मावळताच भाजपचा दुसरा गट सक्रिय झाला आणि त्यांनी हा विषय उचलून धरला. युवा पदाधिकाऱ्यानेही कारवाई झालीच पाहिजे, असा सूर आळवला. त्यामुळे भाजपमध्येच आता दाेन गट उभे राहिले आहेत. लसीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये जाेरदार शाब्दीक चकमक उडण्यास सुरूवात झाली. ही चकमक एवढी वाढत गेली आहे की, थेट एकमेकांची राजकीय कारकीर्दही काढण्यात आल्याची चर्चा आहे. एवढेच नव्हे तर जुना - नवा असाही वाद रंगल्याची चर्चा आहे. त्यामुळे लसीकरणाच्या दिलेल्या ‘डाेस’मुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

........................................

चर्चेपासून काही पदाधिकारी दूर

भाजपने शिबिराबाबत आवाज उठवल्यानंतर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने तब्बल एक तास बंद खाेलीत चर्चा केली. या चर्चेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा विराेध मावळला. या चर्चेदरम्यान काही पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवण्यात आल्याने ‘वादाची’ ठिणगी पडली. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी आक्रमक हाेत काेणतीच ‘सेटलमेंट’ करायची नाही, असा पवित्रा घेतला आहे.

..................................

अंतर्गत धुसफूस

भाजपमध्ये पदाधिकारी बदलानंतर अंतर्गत धुसफूस सुरू आहे. हा बदल अनेकांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे सर्वांसमाेर एकदिलाने काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे आता या वादाचा फायदा उठविण्यासाठी काही पदाधिकारी सरसावले आहेत. तर शहरातील काही जुने पदाधिकारी आपले वजन वापरून इतरांवर दबाव टाकत असल्याने अनेकजण नाराज आहेत.

Web Title: 'Daes' of vaccination 'different' among BJP office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.