डेली हंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:21+5:302021-09-25T04:33:21+5:30

अलीकडे सौभाग्यवती अधूनमधून मोबाइल वापरतात. ते डेली हंट ॲप आहे ना ते तर त्या अधूनमधून बघतातच. त्यावर आलेल्या सगळ्या ...

Daily Hunt | डेली हंट

डेली हंट

googlenewsNext

अलीकडे सौभाग्यवती अधूनमधून मोबाइल वापरतात. ते डेली हंट ॲप आहे ना ते तर त्या अधूनमधून बघतातच. त्यावर आलेल्या सगळ्या बातम्या त्यांना खऱ्या वाटतात. तसे बंडोपंत हसून म्हणाले, बरं मग तुमची काय अडचण आहे त्या डेली हंट वाचतात म्हणून. उलट आपणास अभिमान वाटला पाहिजे की आपल्यापेक्षा आपल्या सौभाग्यवती टेक्नोसॅव्ही झाल्या म्हणून. तसे आम्ही हसून म्हणालो, बंडोपंत त्याचा काहीच प्रश्न नाही हो; पण आम्हास वाटते की, हा सोशल मीडिया चांगला नाही. नवंनवं खूळ माणसांच्या डोक्यात घालतो. म्हणून तर आम्ही हा बटनाचा साधा फोन वापरतो. नको ती कशाची भानगड! असं आपलं मत. आता बघा ना ती शिल्पा शेट्टी काय करते, तिच्या नवऱ्याने तुरुंगात काय काय केले. करिना कपूर सध्या डाएट काय करते. आलिया भट्टचं सध्या काय चाललंय. आई कुठे काय करतेमधील अरुंधती नेमकी कोण

आहे, स्वाभिमानमधील कौस्तुभ कसा चांगला नाही, राजाराणीची गोष्टमधील संजीवनी कशी आहे, मोदींनी केंद्रातील कर्मचाऱ्यांना काय सूट दिली, कंगणाचं सध्या काय चाललंय इथपासून ते हल्ली पाऊसपाणी का वाढलंय, याविषयी सारी माहिती त्या अगदी अचूक सांगतात. मग बंडोपंत खूप आनंदी होऊन म्हणाले, साहेब, खूप चांगली गोष्ट आहे ही. त्यानिमित्ताने का असेना घराबाहेर न जाता वहिनीसाहेबांना एवढं जनरल नॉलेज आलं आहे याचा आनंद तुम्हाला पाहिजे राव. तसे आम्ही हिंदी चित्रपटातील खलनायकासारखे हसून म्हणालो, अहो बंडोपंत आनंद कसा नाही? भरपूर आनंद होतो; पण आम्हास ते सारं ऐकून घेऊन त्यावर प्रतिक्रिया द्या म्हटल्यावर अडचण येते. आता मला सांगा, शिल्पा शेट्टीने ट्विटरवर काय लिहावं हे मी कसं ठरवणार? कोर्टाने तिच्या नवऱ्याला का सोडले हे मला कसे कळणार? पुढे तो तसं करणार

नाही ना? या सौभाग्यवतींच्या प्रश्नाला माझ्यासारखा पामर काय उत्तर देणार किंवा कंगणा अशी का वागत असेल असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नावर आम्ही काय बोलणार. कंगणा काय माझी गर्लफ्रेंड आहे थोडीच. तेव्हा आम्ही काय म्हणतो, हे डेली हंटने आमचा हंट करून टाकलाय. त्यामुळे आम्हास अपडेट राहावे लागते. रोज जनरल नॉलेजवर आधारित पाच-दहा प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यावर बंडोपंत खळखळून हसत म्हणाले, काय करूया साहेब, हा प्रश्न उभा केला त्या डेली हंटने. आपण आता सरळ ज्या माणसाने हे ॲप तयार केलंय त्याच्याकडे जाऊया आणि त्याचाच हंट करूया. म्हणजे वहिनीसाहेबांच्या प्रश्नातून कायमची सुटका होईल. कशी वाटली आयडिया. आम्ही कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय दुसरं काय करणार. बंडोपंतांची हंटवाली आयडिया भन्नाट आवडली; पण त्याचा हंट कसा करायचा हे मात्र सौभाग्यवतींनाच विचारावं लागेल. कदाचित त्याचा क्लू डेली हंटवर पण मिळेल, काय सांगावं?

- डॉ. गजानन पाटील

Web Title: Daily Hunt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.