रत्नागिरीत रमजान ईद पर्यंत शहराला दररोज पाणी पुरवठा
By मेहरून नाकाडे | Published: April 19, 2023 05:28 PM2023-04-19T17:28:33+5:302023-04-19T17:28:57+5:30
संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा
रत्नागिरी : मुस्लिम भाविकांच्या पवित्र रमजान मासची लवकरच सांगता होणार असून रमजान ईद शनिवार दि.२२ रोजी साजरी होणार आहे. रमजान ईद निमित्त शहरातील पाणीपुरवठा ईदपर्यंत दररोज करण्याच्या सूचना मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिल्या आहेत. यामुळे मुस्लिम बांधवांतूनच नाही तर शहरवासियांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.
भारतीय हवामान विभागाने दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल् निनो’ या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शहराला केवळ शीळ या एकमेव धरणातून पाणीपुरवठा सुरू आहे. बाष्पीभवनामुळे शीळ धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होत आहे. सद्य:स्थितीत धरणात केवळ दि. ६ जूनपर्यंत पुरेल इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
शहरात साडे दहा हजार नळजोडण्या असून शहरासाठी दररोज १८ ते १९ दक्षलक्षधनमीटर पाणी पुरवठा होतो. मात्र ‘अल् निनो’च्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाईची झळ नागरिकांना बसू नये, यासाठी रविवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
मुस्लिम भाविकांचा रमजान ईद सण तोंडावर असून तयारी सर्वत्र सुरू आहे. भाविकांची गैरसोय होवून नये यासाठी शिवसेना शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक सुहेल मुकादम, मुसा काझी, बाळू साळवी, निमेश नायर, सामाजिक कार्यकर्ते बारक्या हळदणकर, उमर गालिब मुकादम, जिब्रान तांडेल, करीम वस्ताव यांनी रमजान ईद निमित्त ईद पर्यंत पाणी ठेवण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे मागणी केली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुख्याधिकारी बाबर यांनी मागणीला मान्यता देत ईदपर्यंत शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याची सूचना केली आहे.