दलित साहित्यकार माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:32 PM2020-09-13T15:32:36+5:302020-09-13T15:50:14+5:30
दलित, पीडित समाजाची उपेक्षा आपल्या लेखनीतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यकार माधव गुणाजी कोंडविलकर (८०) यांचे शुक्रवारी रात्री रत्नागिरीत निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रत्नागिरी : दलित, पीडित समाजाची उपेक्षा आपल्या लेखनीतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यकार माधव गुणाजी कोंडविलकर (८०) यांचे शुक्रवारी रात्री रत्नागिरीत निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा जन्म १५ जुलै १९४१ रोजी राजापूर तालुक्यातील मौजे देवाचे गोठणे (सोगमवाडी) या खेड्यात झाला. माधव कोंडविलकर हे रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरात राहत होते. नंतर ते आपले जावई देवदास देवरूखकर यांच्याकडे रत्नागिरीत राहायला गेले. ते गेले काही दिवस आजारी होते. त्यांना रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोविड-१९ पॉझिटिव्ह होते.
त्यांचे 'मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे' हे पुस्तक खूपच गाजले होते. कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन म्हणून हे पुस्तक ओळखले जाते. अजून उजाडायचं आहे, आता उजाडेल!, भूमिपुत्र अशी त्यांची काही पुस्तके गाजलीत.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे, अजून उजाडायचे आहे, अनाथ, छेद, वेध, झपाटलेला, कळा त्या काळच्या, डाळं, देशोधडी, हाताची घडी तोंडावर बोट, आता उजाडेल, एक होती कातळवाडी या कादंबरीचे लेखन माधव कोंडविलकर यांनी केले आहे.
निर्मळ,काहीली हे त्यांचे कथासंग्रह आहेत. देवदासी, कोंगवन हे शोधग्रंथही त्यांनी लिहिले आहेत. बालसाहित्यात ईटुकलेराव,छान छान गोष्टी तसेच देवांचा प्रिय राजा सम्राट अशोक ही पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. तर स्वगत व स्वागत हे संपादित साहित्य माधव कोंडविलकर यांच्या नावावर आहे. कोंडविलकर जे जगले, त्यांनी जे अनुभवले त्याचे चित्रण त्यांच्या कथा, कादंबरीतील पात्रांच्या रुपातून वाचकांसमोर येते. एक तळमळीचा लेखक अशी त्यांची ओळख होती.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही त्यांची गाजलेली कादंबरी होय. याच कादंबरीवरून नाटक झाले होते, तसेच १९८५मध्ये कादंबरीचा फ्रेंच भाषेत अनुवाद झाला होता. १९९२ आणि २००१ मध्ये कादंबरीचा हिंदी अनुवादही झाला होता.
मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे ही कादंबरी त्यांच्या रोजनिशीवर आधारित आहे. ती प्रथम १९७७ मध्ये तन्मय दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर १९७९ साली पत्नी उषा कोंडविलकर यांनी कन्या ग्लोरियाच्या नावाने ती स्वतंत्रपणे प्रकाशित केली. या कादंबरीची १९८७ मध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली.
कोंडविलकर यांनी कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर भगवान बुद्ध, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता
कोकणातील खोत आणि कुळवाडी यांच्याकडून दलित, कष्टकऱ्यांचे शोषण केले जात होते. कोकणातील या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतून कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे आत्मकथन आकाराला आले आहे.
माधव कोंडविलकर यांची पुस्तके
- अजून उजाडायचं आहे (कादंबरी)
- आता उजाडेल ! (कादंबरी)
- एक होती कातळवाडी (कादंबरी)
- घालीन लोटांगण (धार्मिक)
- डाळं (कादंबरी)
- देवांचा प्रिय प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक (ऐतिहासिक)
- निर्मळ (कादंबरी)
- भूमिपुत्र (कादंबरी)
- मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे (दलित साहित्य)
- स्वामी स्वरूपानंद (आध्यात्मिक)
- हाताची घडी तोंडावर बोट (कादंबरी)