खेडमधील धरण १०० टक्के भरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:07+5:302021-09-25T04:34:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
हर्षल शिराेडकर / खेड : तालुक्यातील धरण क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यातील सगळीच धरणे १०० टक्के भरली आहेत. धरणे १०० टक्के भरून वाहू लागल्याने यावर्षी तालुक्याला भेडसावणारी पाणी टंचाई काहीअंशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात नातूवाडी, शेलारवाडी, कोंडिवली, शिरवली, तळवट, खोपी, पोयनार, न्यू मांडवे ही धरणे आहेत. या धरणांपैकी पोयनार आणि न्यू मांडवे ही धरणे अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. अन्य धरणांमध्ये पाणीसाठा केला जातो. परंतु, नातूवाडी आणि शिरवली ही दोन धरण वगळता अन्य कोणत्याही धरणांचे पाणी सिंचनासाठी वापरले जात नाही. कालव्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने या धरणांच्या पाण्यावर शेतकऱ्यांना दुबार शेती करता येत नाही. मात्र, धरणात मुबलक पाणी साठा असल्याने टंचाईच्या काळात धरणातील पाण्याने ग्रामस्थांची तहान भागवणे शक्य होते.
खेड तालुक्यातील चोरटी नदीवर बांधण्यात आलेले नातूवाडी हे धरण तालुक्यातील अनेक गावांसाठी संजीवनी ठरत आले आहे. या धरणाच्या पाण्यावर परिसरातील अनेक शेतकरी दुबार पिके घेऊ लागली आहेत, तर धरणातील पाण्यावर अनेक नळपाणी योजनाही सुरू आहेत. आगामी काळात खेड शहरालाही याच धरणातील पाणी गुरुत्वबलाने पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
तालुक्यातील शिरवली धरणातही मुबलक पाणी साठा आहे. या धरणातील पाण्यावर काही गावांमध्ये दुबार पिके घेतली जातात, काही ग्रामस्थांनी भाजीपाल्याच्या बागाही फुलविल्या आहेत. मात्र, शेलारवाडी, तळवट, खोपी, कोंडिवली, या धरणांच्या कालव्यांचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही यातील एकही थेंब सिंचनासाठी वापरला जात नाही.
-----------------------
गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस
तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यात यंदा १ जून ते २४ सप्टेंबर दरम्यान ४२२९.८० मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी याच मुदतीत ४०२३.५० इतका पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात जास्त पावसाची नोंद झालेली आहे.
-------------------
पाेयनार, न्यू मांडवे धरणांची कामे अर्धवट
पोयनार आणि न्यू मांडवे या धरणांची कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणीसाठा सुरू झाला असता. त्यामुळे अन्य काही गावांचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली निघाला असता. तसेच काही गावातील शेतकऱ्यांना दुबार शेतीही करण्यात आली असती. मात्र, या दोन धरणांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने धरणांसाठी आतापर्यंत केलेला खर्च आजतरी पाण्यात गेल्यासारखा आहे.