खेडमधील पिंपळवाडी धरणाचा बांध ढासळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 06:02 PM2021-08-02T18:02:50+5:302021-08-02T18:05:04+5:30
Flood Khed Ratnagiri: खेड तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
खेड : तालुक्यातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या पिंपळवाडी धरणाचा बांध अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात ढासळला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यासमोर असलेल्या नदी किनाऱ्यावरील सुमारे शंभरहून अधिक लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम करणारा ठेकेदार या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी सरकारने तातडीने चौकशी करण्याची मागणी होत आहे.
तालुक्यातील पिंपळवाडी धरणाला गुरुवारी (२२ रोजी) रात्रीच्या सुमारास मोठा धोका निर्माण झाला होता. धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम या कामाचा ठेका असलेल्या कंपनीने अर्धवट केल्याने धरणाच्या दरवाज्यातून विसर्ग होत असलेले पाणी या संरक्षक भिंतीवरून थेट धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून वाहू लागले.
या पाण्याच्या प्रवाह एवढा मोठा होता की, काही क्षणात धरणाच्या भिंतीचा तब्बल पंचवीस टक्के भाग ढासळून तेथील माती वाहून गेली. गेल्याच वर्षी २ कोटी रुपये खर्च करून सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले होते.
अतिवृष्टीच्या काळात पिंपळवाडी धरणाला धोका निर्माण झाल्याचे उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी जाहीर करत धरणाच्या लाभ क्षेत्रातील नदी किनारच्या सुमारे सात गावातील शेकडो ग्रामस्थांना स्थलांतरित केले.
जलसंपदा विभागाचे सहकार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगल यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, धरणाच्या सांडव्याच्या संरक्षक मार्गदर्शक भिंतीचे काम ठेकेदाराकडून ५० टक्केच झाले आहे. त्यातच गुरुवारी रात्री ढगफुटी झाल्याप्रमाणे सुमारे ४०० मिलिमीटर पाऊस पडला.
धरण शंभर टक्के भरले व पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. धरणातून सांडव्यामार्गे पाण्याचा विसर्ग होत असताना सांडव्याला मार्गदर्शक संरक्षक भिंत नसल्याने दिशा बदलली व धरणाच्या मुख्य बंधाऱ्यावरून पाण्याचा मोठा जलप्रपात कोसळून धरणाच्या भिंतीचे कोट्यवधीचे नुकसान झाले.
यावेळी पाण्याचा प्रवाह थेट लोकवस्तीच्या दिशेने होऊ लागल्याने त्या रात्री नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. पाण्याच्या प्रचंड वेगाने खोपी बौद्धवाडी व सुतारवाडी यांच्यामधील पूलही वाहून गेला आहे, असे गोविंद श्रीमंगल यांनी सांगितले.