तौउते वादळामुळे राजापूर तालुक्यात सुमारे २ कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:33 AM2021-05-19T04:33:19+5:302021-05-19T04:33:19+5:30
- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू - अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित राजापूर : तौउते चक्रीवादळातील ...
- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू
- अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित
राजापूर : तौउते चक्रीवादळातील नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़ सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नुकसानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. या चक्रीवादळात ४१० घरे, ३७ गोठे व २० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्यापही पंचनाने सुरू असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
तौक्ते चक्रीवादळाते राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांबरोबरच ग्रामीण भागातही तडाखा दिला आहे. तालुक्यात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे, या १३ ग्रामपंचायतीमधील गावे व वाड्यांमध्ये या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या परिसरात ५ घरांचे पूर्णत: तर ४१५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर ३७ गोठ्यांची पडझड झाली असून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा २० सार्वाजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनामे सध्या करण्यात आले आहेत.
काही भागांत आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. नेरकेवाडी येथील तानाजी शंकर विचारे यांच्या काजू बागेला या वादळाचा तडाखा बसला असून, काजूच्या रोपांची पुरती धुळधाण उडाली आहे. यात विचारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागातर्फे मंगळवारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.
या वादळाचा तडाखा महावितरणला बसला असून अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही़ नाटे, साखरीनाटे, कारिवणे, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द, देवाचे गोठणे या परिसरात अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. तर पाचल, ओणी, सौंदळ परिसरासह अन्य भागातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते़