वणव्यांमुळे औषधी वनस्पतीसह जनावरांच्या वैरणीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:32 AM2021-03-27T04:32:40+5:302021-03-27T04:32:40+5:30
khed-photo262 खेड तालुक्यातील कशेडी डोंगरावर वणवा लागल्याने माेठे नुकसान झाले आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क खेड : तालुक्यात वणवे लागण्याच्या ...
khed-photo262 खेड तालुक्यातील कशेडी डोंगरावर वणवा लागल्याने माेठे नुकसान झाले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असल्याने निसर्गसंपदेचा ऱ्हास होत आहे. दोन दिवसांपूर्वी भोस्ते आणि कशेडी या दोन ठिकाणी डोंगरांना लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतीसह जनावरांच्या वैरणीची राख झाली आहे. वणव्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
उन्हाळा सुरू झाला की रानात वणवे लागायला सुरुवात होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगलसंपदा जळून खाक होते. काही ठिकाणी जनावरांचे गोठे, जनावरे, आंबा-काजूची कलमे जळून खाक होतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. मात्र, वणव्यात होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळत नसल्याने वणव्याचे बळी ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. दोन दिवसांपूर्वी भोस्ते आणि कशेडी या गावांच्या हद्दीत लागलेल्या वणव्यात लाखो रुपयांची वनसंपदा जळून खाक झाली आहे. शिवाय जंगली प्राणी, पक्षी यांच्या नैसर्गिक अधिवासाला धोका पोहोचला आहे. या दोन्ही ठिकाणचे वणवे कसे लागले याचे कारण अद्याप कळले नाही. वणव्याच्या कारणांबाबत वनपालांना विचारले असता ज्या जंगलामध्ये वणवा लागला ते जंगल वन विभागाच्या ताब्यात नाही; त्यामुळे वणवा कसा लागला, हे माहीत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जंगलात लागणारे वणवे आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कुणाला धरायचे? या प्रश्न निर्माण होत आहे.