झाड पडून पाच घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:20 AM2021-07-22T04:20:24+5:302021-07-22T04:20:24+5:30
लांजा : तालुक्यातील इसवली पनोरे येथे मंगळवारी पहाटे आंब्याचे ...
लांजा : तालुक्यातील इसवली पनोरे येथे मंगळवारी पहाटे आंब्याचे भले मोठे जुनाट झाड घरांवर कोसळल्याने एक घराचे पूर्णतः तर चार घरांचे अंशतः नुकसान झाले. सुदैवाने घरातील कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही, किरकोळ जखमी होण्यावर निभावले.
सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला होता. इसवली पनोरे - मोरेवाडी येथील पर्शुराम पांडुरंग वाईम व जालिंदर जानू वाईम यांच्या घराशेजारी तुळाजी मोर्ये यांच्या मालकीचे जुनाट आंब्याचे झाड मंगळवारी पहाटेच्या सुमारास घरावर पडल्याने या दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले. आजूबाजूला असलेले सुरेश महादेव भुवड, भिकाजी पड्यार, संदीप नरसळे यांच्या घरांचेही अंशतः नुकसान झाले आहे. एकूण २ लाख ८ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास या घरांवर झाड पडले, त्यावेळी पाचही घरांमधील लोक साखरझोपेत होते. झाड पडल्यानंतर घरावरील सिमेंटचे पत्रे फुटल्याने काहीजण किरकोळ जखमी झाले. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच तलाठी, प्रशासकीय कर्मचारी, सरपंच आकांक्षा नरसले, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, लांजा सभापती मानसी आंबेकर, जिल्हा परिषद सदस्य पूजा आंबोलकर, जिल्हा बँक संचालक आदेश आंबोलकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्तांना मदत केली.