अवकाळी पावसामुळे पाचल परिसरात बागायतदारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:36+5:302021-04-16T04:31:36+5:30
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी ...
पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात वादळीवाऱ्यासह काेसळलेल्या अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरीवर्गामधून करण्यात येत आहे.
सातत्याने बदलणारे हवामान, अधूनमधून गारांसह पडणारा पाऊस यामुळे अगोदरच आंब्याचे पीक फारच कमी होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत होता. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करीत होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आंबा पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तयार झालेल्या हापूस आंब्यांचा सर्वत्र खच पडला आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी गलीतगात्र झाला असून, आता निसर्गही मागे लागल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नुकसानाची तातडीने दखल घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे.