तौक्ते वादळामुळे तालुक्यात एक काेटीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:32 AM2021-05-21T04:32:52+5:302021-05-21T04:32:52+5:30
राजापूर : तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरे, गोठे यासह विजेचे खांब पडून पडझड झाली. ...
राजापूर : तौक्ते वादळाचा राजापूर तालुक्याला जोरदार तडाखा बसला. अनेक ठिकाणी घरे, गोठे यासह विजेचे खांब पडून पडझड झाली. त्याचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, प्रथमदर्शनी पंचनाम्याच्या आलेल्या अहवालानुसार सुमारे एक कोटी चार लाख ४४ हजार ४७१ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नुकसानीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झाली. अनेक घरे, गोठे यांचे छप्पर उडून वा घरावर झाडे पडून नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्याद्वारे पुढे आले आहे. त्यामध्ये कच्चे आणि पक्के अशा ६७६ घरांचे तर ४६ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. दहा अंगणवाड्यांसह प्रत्येकी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, ३५ शाळांच्या इमारती, चार ग्रामपंचायतीचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळून आणि वीजवाहिन्या तुटून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. सद्य:स्थितीमध्ये पूर्ण झालेल्या पंचनाम्यानुसार कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून तर काही ठिकाणी वीजवाहिन्या तुटून नुकसान झाले आहे. त्यांच्या जोडणीचे काम सुरू असून, काही गावांमधील जोडणीचे पूर्ण होऊन खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववतपणे सुरू झाला आहे.